Hamas Attack on Israel: नवी दिल्ली : इस्रायल (Israel) आणि हमास (Hamas) यांच्यातील युद्ध काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही आहे. अशातच गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्रायली सैन्य सातत्यानं हमासवर हल्ले करत आहे. परंतु, तब्बल पाच महिन्यांनंतर हमासनं इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये रॉकेट हल्ला केला आहे. गाझामधून इस्रायलवर जणू रॉकेट्सचा पाऊसच पडत होता. गाझामधून करण्यात आलेल्या मिसाइल अटॅकनंतर तेल अवीवमध्ये हाहाकार पसरला. तेल अवीवमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले. लोक सुरक्षित स्थळी धावताना दिसले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासनं जानेवारीनंतर गाझामधून कोणताही हवाई हल्ला केलेला नव्हता. पण इजिप्त आणि कतारच्या मध्यस्थीनं मांडलेला शस्त्रसंधी प्रस्ताव मान्य करुनही इस्रायलकडून कोणताही प्रतिसाद न आल्यानं हमासकडून हवाई हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आयसीजे म्हणजेच, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिसच्या युद्ध थांबवण्याच्या आदेशानंतरही हमासकडून करण्यात आलेला हवाई हल्ला संपूर्ण जगाला हैराण करणारा आहे. दरम्यान, हमासकडून करण्यात आलेल्या हवाई हल्लात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आयडीएफनं बहुतेक क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली.
इस्रायलच्या संरक्षण दलाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, गाझामधील रफाह येथून मध्य इस्रायलच्या दिशेनं रॉकेट हल्ला करण्यात आला. यापैकी अनेक रॉकेट आयडीएफनं हवेतच नष्ट केले. रविवारी सकाळपासून केरेम शालोम क्रॉसिंगद्वारे गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवली जात आहे. परंतु, हमासकडून रॉकेट डागले जात आहेत. हमासनं आपल्या नागरिकांविरुद्ध जायोनी नरसंहाराला प्रत्युत्तर म्हणून तेल अवीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असल्याचं सांगितलं.
गाझा पट्टीत हमासकडून ओलिस ठेवण्यात आलेल्यांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायली नागरिक संतप्त
इस्रायलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात निदर्शनं सुरू आहेत. शनिवारीही हजारो लोक ओलिसांच्या सुटकेच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते, मात्र यादरम्यान त्यांची पोलिसांशी जोरदार चकमक झाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी वॉटर कॅननचाही वापर केला. खरं तर, या आठवड्यात गाझामध्ये हमासकडून बंधक बनवण्यात आलेल्या तीन इस्रायली नागरिकांचे मृतदेह सापडले होते, त्यानंतर आंदोलकांचा संताप आणखी शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालेलं.
ऑर्थोडॉक्स ज्यूंच्या विरोधात इस्रायलची कारवाई
दुसरीकडे, लेबनॉनच्या सीमेला लागून असलेल्या इस्रायलच्या माऊंट मेरॉनमध्येही पोलिसांनी ऑर्थोडॉक्स ज्यूंवर कारवाई केली आहे. यादरम्यान दोन गटांत जोरदार हाणामारी झाली, ज्याचा व्हिडीओ पोलिसांनी जारी केला आहे. ऑर्थोडॉक्स ज्यू त्यांच्यावर दगडफेक करत असल्याचा आरोप केला. पोलिसांनी ही कारवाई लग बामाओमेर या पवित्र सणाच्या आधी केली. या सणानिमित्त हजारो लोक एकत्र जमणार होते. माउंट मेरॉन लेबनीज सीमेपासून 10 किमी अंतरावर आहे.
आयसीजेच्या आदेशानंतरही गाझामध्ये हल्ले जारी
हेग, नेदरलँड्समध्ये उपस्थित असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून इस्रायलला मोठा धक्का बसला आहे. आयसीजे म्हणजेच, इंटरनेशनल कोर्ट ऑफ जस्टिसनं इस्रायलला गाझामधील रफाह येथे सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या याचिकेवर संयुक्त राष्ट्राच्या सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. पण, असं असूनही इस्रायली सैन्यानं गाझामध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. आयडीएफ गाझामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे सतत हवाई हल्ले करत आहे.