इस्लामाबाद : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदच्या नाड्या आता चांगल्याच आवळल्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं एक शिष्टमंडळ पाकिस्तान दौरा करणार आहे. या दौऱ्यात हाफिजवर कारवाईसाठी राष्ट्र संघाकडूनही पाकिस्तानवर दबाव वाढू शकतो. त्यामुळे हाफिजने अटक टाळण्यासाठी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली आहे.


‘भारत आणि अमेरिकेच्या दबावामुळे आपल्याला अटकेची शक्यता असल्याचे,’ त्याने या यचिकेत म्हटलं आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिज सईद आणि त्याच्याशी संबंधित संस्थांची संपत्ती जप्त केलीच जाईल, याचा पुनरुच्चार केला.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची 1267 सेक्शंसचं एक शिष्टमंडळ या आठवड्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. हे शिष्ठमंडळ पाकिस्तान आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे सर्व नियम योग्य प्रकारे पाळतो की नाही, याची पाहाणी करणार आहे. दोन दिवसीय हा दौरा गुरुवारपासून सुरु होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हाफिजला अटकेची भीती सतावत असून, अटकपूर्व जामीनासाठी त्याने हायकोर्टात धाव घेतली आहे.

‘आपल्याला अटक करु नये, तसेच आपल्या कोणत्याही संघटनांवर कारवाई करु नये,’ अशी मागणी त्याने याचिकेद्वारे केली आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांनी हाफिजची संपत्ती जप्त केलीच जाईल, असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन, पाकिस्तान दहशतवाद विरोधातील लढाईत कोणतीही साथ देत नसल्याचा आरोप केला होता. तसेच, पाकिस्तान एक नंबरचा खोटारडा आणि विश्वासघातकी देश असल्याचं म्हटलं  होतं.

ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर देताना अब्बासी यांनी, “आम्ही हाफिजच्या संपत्ती जप्त करण्यासाठी तयार आहोत. पण अमेरिकेने आम्हाला कमजोर बनवण्याचे प्रयत्न करु नयेत.” असं म्हटलं आहे.