न्यूयॉर्क: गोळीबाराच्या घटनेमुळे अमेरिका पुन्हा एकदा हादरली आहे. अमेरिकेच्या टेक्सासमधील शाळेत एका तरुणानं अंधाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात 18 मुलांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक मुलं गोळीबारात जखमी झाली आहेत. हल्लेखोर तरुण 18 वर्षांचा असून त्याने मशीनगनने शाळेत गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 18 वर्षीय हल्लेखोर युवकाचा मृत्यू झाला आहे. 


गेल्या दहा दिवसांमध्ये घडलेली ही दुसरी घटना आहे आणि या वर्षीची आठवी मोठी गोळीबाराची घटना आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीच्या देशात शस्त्रांची संख्या ही लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या इतक्या घटना घडतात, शाळेच्या मुलांच्या हातातही लोडेड गन्स येतात या गोष्टी अतिशय घातक आहेत. पण इतक्या घटना घडल्या तरी त्या देशात शस्त्रास्त्रांच्या वापरावर नियंत्रणं येत नाहीत हे विशेष. खरेतर शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर नियंत्रण येऊ नये, त्यांची विक्री वाढत रहावी यासाठी अमेरिकेमध्ये मोठी लॉबी कार्यरत आहे. त्याचसंबंधित एक आकडेवारी पाहुयात,


लोकसंख्येपेक्षा बंदुकींची संख्या जास्त
अमेरिकेतील एकूण लायसन्स असलेल्या बंदुकींची संख्या ही 39  कोटी (2018) इतकी आहे. तर अमेरिकेची लोकसंख्या ही 33 कोटी (2018) इतकी आहे.


गन व्हॉयलन्समुळे अमेरिकेचे झालेले आर्थिक नुकसान- 280 अब्ज डॉलर्स (22 लाख कोटी) वार्षिक
अमेरिकेमध्ये सातत्याने होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांमुळे रोजच्या वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च मोठा आहे. गोळीबारामुळे होणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी अमेरिकन करदात्यांना रोज जवळपास 271 कोटी रुपयांचा भूर्दंड बसतो. यामध्ये फर्स्ट रिस्पॉन्स, अॅम्ब्युलन्स, उपचार, पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेचा समावेश होतो. 


गन व्हॉयलन्समुळे बळी पडणारे कुटुंबांचे आर्थिक नुकसान- एका कुटुंबामागे तब्बल 36 कोटी रुपयांचे नुकसान होतं. त्यामध्ये मेडिकल बिल्स आणि मेंटल हेल्थ सपोर्टचा समावेश होतो. 


प्रत्येक कर्मचाऱ्याचे नुकसान किती?  
अमेरिकेमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यामागे उत्पादन आणि महसुलाचा विचार करता 11 कोटी रुपये इतकं नुकसान होतं. तर प्रत्येक नागरिकाचे जवळपास 67,000 रुपये इतकं नुकसान होतं.




(Source: Everytown Research & Policy)


अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका बाळगण्याची परवानगी का? 
अमेरिकन संविधानातील दुसऱ्या घटना दुरुस्तीमध्ये राईट टू बीअर आर्म्स म्हणजे शस्त्रास्त्र जवळ बाळगण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला देण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकाला स्वत:च्या संरक्षणासाठी जवळ बंदुक बाळगण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच प्रत्येक राज्याचे स्वत:चे गन लॉज म्हणजे बंदुका बाळगण्याविषयी कायदे आहेत. त्यातही डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी या संबंधीचे कायदे अधिक उदार असल्याचं दिसून येतंय. 


100 रहिवाशांमागे एक फायरआर्म्स
अमेरिकेमध्ये प्रत्येक 100 रहिवाशांमागे एक फायरआर्म असल्याची नोंद आहे. ही संख्या युद्धग्रस्त असलेल्या येमेनपेक्षाही जास्त आहे. 


गोळीबाराच्या घटनेमुळे अमेरिकेत झालेले मृत्यू
अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटनेमुळे एकाच वर्षात तब्बल 45,222 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2020 सालच्या एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. यामध्येही सरासरी पाहता दर दिवशी अमेरिकेमध्ये 124 लोकांना गोळीबारामुळे जीव गमवावा लागतो. दर तासाचा विचार करता अमेरिकेत 5 लोकांना गोळीबारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 


गोळीबारामध्ये मृत झालेल्या एकूण संख्येपैकी 54 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहे. ही संख्या 24,292 इतकी आहे. तसेच 43 टक्के म्हणजे 19,384 इतक्या लोकांची हत्या झाली आहे. 2020 साली झालेल्या 45,222 इतके मृत्यू हे नोंद करण्यात आलेले आहेत. प्रत्यक्षातील आकडेवारी ही मोठी आहे. 


गोळीबाराच्या घटनांमध्ये झालेले मृत्यू




Source: Centre for Disease Control and Prevention (Prepared by Pew Research)


गोळीबारामुळे झालेले मृत्यू
जगभरातल्या विकसित देशांचा विचार करता अमेरिकेत गोळीबारामुळे झालेले मृत्यू हे अधिक असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. 




सन 2000 मध्ये गर्दीच्या ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटना या केवळ दोन होत्या. 2020 साली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ती संख्या 40 वर पोहोचली. 




(Source: FBI)


अमेरिकेतील गन लॉबी
अमेरिकेतील नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) ही गन लॉबी कार्यरत आहे. अमेरिकेमध्ये लोकांनी बंदुक खरेदी कराव्यात, सरकारने त्यासाठी सकारात्मक धोरणं तयार करावे यासाठी ही लॉबी कार्यरत असते. काँग्रेसच्या सदस्यांनी या गोष्टीसाठी मदत करावी यासाठी त्यांना अनुकूल निर्णय घेतले जातात. 


नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) चे बजेट
अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्रांच्या विक्रीमध्ये वाढ कायम रहावी यासाठी लॉबिंग करण्यासाठी नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) या संस्थेकडून दरवर्षी तब्बल 1,937 कोटी रुपये खर्च केले जातात. 


नॅशनल रायफल असोसिएशन (NRA) कडून अध्यक्षीय निवडणुकीमध्येही आर्थिक मदत केली जाते, उमेदवारांना फंडिंग केले जाते. 2012 सालची तुलना करता 2016 साली या खर्चात 36 टक्क्यांची वाढ झाल्याची नोंद आहे. या काळात एनआरएच्या महसुलातही 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. 


सन 2016 सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये या लॉबीकडून 426 कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. 2020 साली ही रक्कम कमी होऊन 232 इतकी झाली. 


गन लॉबी संपावी यासाठीही अमेरिकेत लॉबिंग
अमेरिकेमध्ये शस्त्रास्त्रांच्या विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी जशी एक लॉबी कार्यरत आहे तशीच ही गन लॉबी संपावी यासाठीही एक लॉबी कार्यरत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शस्त्रांस्त्रांच्या वापरावर, विक्रीवर नियंत्रण यावं यासाठी एक कायदा आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 2019 साली अमेरिकेत झालेल्या एका अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेनंतर तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही देशात शस्त्रांस्त्रांच्या वापरासंबंधी कडक कायदा आणण्याची इच्छा व्यक्त केली होती, नंतर त्यांनी त्यावर काहीच केलं नाही. 


बराक ओबामा यांनी त्यांच्या कार्यकाळात गन व्हायलन्स संपावा, शस्त्रास्त्र विक्रीवर नियंत्रण यावं यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांनी त्यांच्या पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीत यावर कोणतेही भाष्य केलं नाही.