लॉस अँजेलिस : भारतीय तबलावादक संदीप दास यांचा ग्रॅमी पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. 'सिंग मी होम' या गाण्यासाठी जागतिक संगीत प्रकारात दास यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळाला आहे. चिनी आणि अमेरिकन कलाकारांसमेवत संदीप दास यांना हा पुरस्कार प्राप्त झाला.

'यो-यो मा'चं 'सिंग मी होम' हे गाणं जगभरातील विविध कलाकारांनी संगीतबद्ध आणि संगीत संयोजन केलं आहे. यो-यो मा आणि संदीप दास यांच्याव्यतिरिक्त न्यूयॉर्कमधील सिरीयन सनईवादक किनान अझमे यांचाही समावेश आहे. अझमे यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या आदेशाचा फटका बसला होता.

ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला संदीप दास यांनी लाल कुर्ता घालून हजेरी लावली होती. या गाण्यातून एकता आणि परस्परांच्या संस्कृतीचा आदर बाळगण्याचा संदेश दिला जात असल्याच्या भावना यावेळी दास यांनी व्यक्त केल्या.

ज्येष्ठ सितारवादक पंडित रवी शंकर यांची कन्या, प्रसिद्ध सितारवादक अनुष्का शंकर यांच्या 'लँड ऑफ गोल्ड'लाही ग्रॅमी पुरस्कारातील जागतिक संगीत प्रकारात नामांकन मिळालं होतं. अनुष्का शंकर यांना सहावेळा या प्रकारात नामांकन मिळालं आहे. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी अनुष्का यांना पहिलं नामांकन मिळालं होतं. मात्र प्रत्येकवेळी ग्रॅमी पुरस्काराने त्यांना हुलकावणी दिली आहे.