Google Doodle : कोरोनासारख्या महामारीमुळे लाखो जीव गेले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर जलदगतीने लस शोधण्यात आली. पण शंभर-दीडशे वर्षापूर्वी अशा लसी शोधणं किती अवघड काम असेल याचा विचार न केलेला बरा. या अशा जीवघेण्या महामारीवर जगातली पहिली प्रभावी लस शोधण्याची कमाल पोलंडच्या संसर्गतज्ञ असलेल्या रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी केली. रुडॉल्फ वेगल यांच्या आज 138 व्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अनोखी मानवंदना दिली आहे. (138th birthday celebration Polish Inventor immunologist Rudolf Stefan Weigl)


पोलंडचे संशोधक, डॉक्टर आणि संसर्गतज्ञ असेलेले रुडॉल्फ स्फीफन वेगल यांचा जन्म 1883 साली ऑस्ट्रो-हंगेरी म्हणजे सध्याच्या झेक रिपब्लिक या ठिकाणी झाला. त्यांनी आपले शिक्षण पोलंडच्या Lwów विद्यापीठात घेतलं. त्यानंतर 1914 साली त्यांची नियुक्ती पोलिश आर्मीमध्ये पॅरासिटॉलॉजिस्ट म्हणून करण्यात आली. त्या दरम्यान युरोपमध्ये टायफस (Epidemic Typhus) हा जीवघेणा संसर्गजन्य रोग पसरत होता. दिवसेंदिवस त्याची तीव्रता वाढत असल्याने अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत होते. रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी त्यावर लस शोधण्याचे आव्हान स्वीकारलं. 


टायफस हा रोग Rickettsia prowazekii या बॅक्टेरियापासून तयार होत होता. त्यावर वेगल यांनी संशोधन सुरु केलं. 1936 साली रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी टायफसवर प्रभावी लस शोधली. तो काळ म्हणजे जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलेला काळ होता. त्यामुळे जर्मनीने त्यांना जबरदस्तीने या लसीची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करायला सांगितली. मग रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांच्या मदतीने या लसीची निर्मिती करणारा मोठा प्लॅन्ट उभा केला. 


रुडॉल्फ स्फीफन वेगल यांनी निर्माण केलेल्या लसीमुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात टायफसच्या संसर्गापासून लाखो लोकांचे जीव वाचले. त्यामुळे रुडॉल्फ स्फीफन वेगल यांची प्रतिमा एक यशस्वी संशोधक आणि हिरोच्या रुपात आहे. विशेष म्हणजे आपल्या संशोधनासाठी रुडॉल्फ स्फीफन वेगल यांना तब्बल दोन वेळा नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 


लहान-लहान गोष्टींवर सातत्याने आणि न थांबता संशोधन करुन कोट्यवधी नागरिकांचा जीव वाचवता येऊ शकतो हेच रुडॉल्फ स्फीफन वेगल यांच्या कार्यातून स्पष्ट होतं. आजच्या कोरोना महामारीच्या काळात रुडॉल्फ स्फीफन वेगल यांचे कार्य उल्लेखनीय आहे.