नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट सुद्धा येऊ शकते असा इशारा जर्मनीच्या रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटमधील (RKI) तज्ञांनी दिला आहे. कोविड-19 सारख्या महामारीमध्ये जोवर 60 ते 70 टक्के लोकांना संसर्ग होत नाही तोवर विषाणूचा प्रसार होतच राहतो असं RKI चे तज्ञ डॉक्टर सांगतात. गेल्या काही दिवसांपासून युरोपातील विविध देशांनी लॉकडाऊन शिथील करणं सुरु केलं आहे त्या पार्श्वभूमीवर हा इशारा महत्वाचा मानला जात आहे. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली असूनही युरोप संकटाच्या तावडीत आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) तज्ञांनी गेल्या आठवड्यात दिला होता.
रुग्णांची संख्या कमी होत असली तरी युरोपवरील कोरोनाचा विळखा सैल झाला नसल्याचं मत जागतिक आरोग्य संस्थेनंही व्यक्त केलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आणि लोकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं हे महत्वाचे उपाय असतील असं तज्ञ सांगत आहेत.
आरकेआयचे अध्यक्ष प्रोफेसर लोथर व्हिलर यांनी सांगितले की, हा साथीचा रोग संपूर्ण जगभरात पसरला आहे. जगभरात 60 ते 70 टक्के लोकांना संसर्ग होईपर्यंत हा विषाणूजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे, असं व्हिलर म्हणाले.
कोरोनाची दुसरी लाट येईल अशी खात्री अनेक संशोधकांना आहे बर्याच जणांनी तिसऱ्या लाटेबाबत देखील अंदाज व्यक्त केला आहे, असं व्हिलर यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे कोरोना संक्रमण होण्याची आणि संसर्गाची संख्या कमी होत आहे. ही खूप चांगली बातमी आहे, असं देखील व्हिलर यांनी सांगितलं आहे.
अलिकडच्या आठवड्यांमध्ये आरकेआयकडे दररोज 700 ते 1600 नवीन कोरोना प्रकरणे येत आहेत. जी आधी जास्त होती. ते म्हणाले की, याचा पुनरूत्पादनचा सरासरी दर 0.71 इतका आहे. याचाच अर्थ असा की, प्रत्येक कोरोना बाधित रुग्ण हा विषाणू दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचवत नाही.
परंतु अनेक महिन्यांपासून आपण जे सोशल डिस्टन्सिंग पाळत आहोत, ते आणखी काही काळ पाळणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
जगभरात 2 लाख 58 हजारांवर मृत्यू
जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 37 लाख 25 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 12 लाख 42 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजून जवळपास 22 लाख 25 हजार लोकं कोरोनाबाधित आहेत. त्यातील दोन टक्के म्हणजे 49 हजार 250 हजार गंभीर आहेत.
Corona | कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट येण्याची शक्यता, जर्मनीच्या नामांकित RKI संस्थेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 May 2020 08:26 AM (IST)
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आणि लोकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणं हे महत्वाचे उपाय असतील असं तज्ञ सांगत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -