G20 Summit : इंडोनेशियामध्ये (Indonesia) G-20 शिखर परिषदेचा (G-20 Summit) समारोप झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) भारतात परतले आहेत. कोरोना कालावधीनंतर G-20 ची ही पहिलीच बैठक होती. या परिषदेदरम्यान, भारतीय पंतप्रधानांनी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष तसेच पंतप्रधानांची भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. आता पुढील G-20 शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे. म्हणजेच 2023 मध्ये भारत G-20 चे आयोजन करणार आहे. या दोन दिवसीय शिखर परिषदेच्या समारोपाच्या वेळी जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण आणि त्याचे जगावर होणारे व्यापक परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यात पुढे म्हटले आहे की “संघर्षांचे शांततापूर्ण निराकरण, संकटांवर मात करण्यासाठी प्रयत्न तसेच संवाद आवश्यक आहे. आजचे युग युद्धाचे नसावे. असं म्हटलंय
मोदी-ज्यो बायडेन-ऋषी सुनक भेट चर्चेचा विषय
बालीमध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. परिषदेच्या पहिल्या सत्रात भारताचे महत्त्व मांडण्यात आले. मोदी यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबतची भेट चर्चेचा विषय होता. इमॅन्युएल मॅक्रॉनही तेथे पोहोचले आणि तिन्ही नेते काही वेळ बोलत राहिले. यानंतर ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक आणि मोदी यांची दोनदा भेट झाली. त्यांची मंगळवारी अनौपचारिक भेट झाली आणि बुधवारी औपचारिक चर्चा झाली. यावेळी ब्रिटनकडून लगेचच 3,000 भारतीयांना नवीन व्हिसा जारी केला जाईल, असे जाहीर केले.
जिनपिंग यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
भारत आणि चीनमध्येही अनेक दिवसांपासून सीमावाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधात कटुता आहे. LAC वर चिनी सैन्याच्या घुसखोरीमुळे हे संबंध आजतागायत सुधारू शकलेले नाहीत. दरम्यान, G-20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात भेट झाली. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी आयोजित केलेल्या डिनरमध्ये ही भेट झाली आणि दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. याठिकाणी जी-20 चे सर्व प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष समोरासमोर आल्यावर भेट झाली. तब्बल 3 वर्षांनंतर दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. विशेष म्हणजे, 15 आणि 16 सप्टेंबरला SCO समिटमध्ये मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली होती, पण तेव्हा दोघांनीही एकमेकांकडे पाहिले नव्हते.
ज्यो बायडेन आणि जिनपिंग यांची भेट
या G-20 परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा झाली. जगभरातील देश या बैठकीकडे अमेरिका-चीनचे नवे संबंध म्हणून पाहत आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये अनेक दिवसांपासून तणाव आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर दोन्ही देशांनी एकमेकांना इशारा दिल्याचं समजते. या संभाषणात तैवानच्या मुद्द्यावरही चर्चा झाली आणि दोन्ही देशांनी शांतता राखण्यासाठी हा मुद्दा पुढे नेला. ही शिखर परिषद संपल्यानंतर आणखी एक महत्त्वाची, पण विचित्र घटना घडली. चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो आमनेसामने आले तेव्हा वातावरण खूपच तणावाचे दिसले. दोन्ही नेत्यांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून काहीतरी वाद सुरू असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
G20 चे पुढील अध्यक्षपद भारताकडे सोपवणार
आज G20 शिखर परिषदे दरम्यान इंडोनेशिया G20 चे अध्यक्षपद भारताकडे सोपवले आहे. भारत 1 डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे G-20 गटाच्या नेत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये उदयपूरमध्ये त्याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राजस्थानमधील तीन शहरे या गटाचे आयोजन करणार आहेत. जयपूरसह उदयपूर आणि जोधपूरमध्ये परिषदा होणार आहेत. या संपूर्ण G-20 परिषदेत भारतासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारत या शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. बाली परिषदेच्या समारोपानंतर, इंडोनेशियाने येत्या वर्षासाठी G20 चे अध्यक्षपद भारताकडे सुपूर्द केले आणि पंतप्रधान मोदींनी ही प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले
वेगवेगळ्या विषयांवर परिषद
भारताला औपचारिकपणे G-20चे यजमानपद मिळाले आहे. त्याचे उद्घाटन सत्र डिसेंबर 2022 मध्ये उदयपूर येथे होणार आहे. राजस्थानातील उदयपूर, जोधपूर आणि जयपूर या तीन शहरांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर परिषदा होणार आहेत. 1 डिसेंबरपासून भारत G20चे अध्यक्षपद भूषवणार आहे. ब्राझीलला हा मान 2024 मध्ये मिळणार आहे.