Low Birth Rate in Japan : जपानमधील जन्मदर कमी झाल्याने सरकारसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. जन्मदर वाढवण्यासाठी वर्षभरापासून सरकारकडून सर्वतोपरी करण्यात येत असताना सुद्धा जपानमधील जन्मदर विक्रमी नीचांकावर घसरला आहे. जपानमधील घटती लोकसंख्या ही अलिकडे सर्वात मोठी समस्या बनताना दिसत आहे. घटत्या लोकसंख्येवर उपाय म्हणून सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. तरीही गेल्या वर्षभरात लोकसंख्या वाढण्याऐवजी घटली आहे. जपानमधील जन्मदर वाढवण्याचं मोठं संकट सध्या सरकारसमोर आहे. यामुळे सरकार विविध उपाययोजना राबवत जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देत आहे. यासाठी आता सरकार चार दिवसांचा आठवडा करणार आहे.


आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि नंतर करा रोमान्स


जन्मदर वाढवण्यासाठी जपान सरकारने चार दिवसांचा आठवडा करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सु्ट्टी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जन्मदर वाढवण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं, हा यामागचा उद्देश आहे. म्हणजे सरकारचं नागरिकांना रोमान्स करण्यासाठी वेळ देण्याचं नियोजन केलं आहे. एप्रिल 2025 पासून हा निर्णय लागू होणार आहे. यानुसार, मेट्रो सिटीमधील सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील फक्त चार दिवस काम करावं लागणार असून त्यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. 


जपान सरकार देतंय खास सुट्टी


टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय जाहीर करताना सांगितलं की, एप्रिल 2025 पासून मेट्रो शहरातील सरकारी कर्मचाऱ्यांना दर आठवड्याला तीन दिवस सुट्टीचा पर्याय असेल. टोकियो मेट्रोपॉलिटन असेंब्लीच्या चौथ्या नियमित सत्रात त्यांनी आपल्या धोरणात्मक भाषणादरम्यान सांगितलं की, "चार दिवसांच्या आठवड्याचा निर्णय लवचिकतेसह  होईल आणि याचा कामावर परिणाम होणार नाही, यासाठी याचं पुनरावलोकन करण्यात येईल.


जपानमधील जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. यामुळे सरकारने चार दिवसीय कामाचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानी नागरिकाचे सरासरी वय 49.9 आहे. जानेवारी ते जून या कालावधीत देशात 350,074 जन्मांची नोंद झाली आहे. 


आठवड्यातून 3 दिवस सुट्टी, 4 दिवस काम


जपान लोकसंख्येच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे त्याची राजधानी टोकियो ही समस्या काही नवीन मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारमे आता नवा पर्याय शोधला आहे. हा म्हणजे 4 दिवस कामाचा आठवडा. एप्रिलपासून टोकियो मेट्रोपॉलिटन सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करण्याची परवानगी देणार आहे. व्यस्त जीवनातून कर्मचाऱ्यांना फॅमिली प्लॅनिंगसाठी वेळ मिळावा, यासाठी सरकारचं हे पाऊल आहे.


नवीन पालकांसाठीही सुविधा


याशिवाय नवीन पालकांसाठी "बाल संगोपन आंशिक रजा" धोरण देखील देणार आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दररोज दोन तास कमी काम करण्याची परवानगीही मिळेल. टोकियोचे गव्हर्नर युरिको कोइके यांनी सांगितलं की, हे पाऊल जे पालक मुलांची काळजी आणि काम यांच्यातील संतुलन राखण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.