वॉशिंग्टन : तुमची बाजू सत्याची असेल, तर न्यायाचं पारडं तुमच्या बाजूने कधी ना कधी झुकतंच, असं म्हटलं जातं. 'बलात्कारी' असा शिक्का माथी घेऊन आयुष्य व्यतित केलेल्या चौघांच्या पदरात न्यायाचं दान पडण्यासाठी एक-दोन नव्हे, तर तब्बल 70 वर्ष लागली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अमेरिकेतील चार कृष्णवर्णीयांना अशावेळी न्याय मिळाला, जेव्हा त्यांच्यापैकी एकही जण हयात नाही. 87 वर्षीय तक्रारदार तरुणीने 'मी खोटं बोलले' अशी कबुली दिली.

यूएसमधील फ्लोरिडामध्ये 1949 साली 17 वर्षीय गौरवर्णीय तरुणीने चौघा कृष्णवर्णीयांवर बलात्काराचा आरोप केला होता. कार नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यात मदत मागताना चौघांनी आपल्यावर अत्याचार केले, असा बनाव तक्रारदार तरुणीने रचला होता. चार्ल्स ग्रीनली, वॉल्टर अर्विन, सॅम्युअल शेफर्ड आणि अर्नेस्ट थॉमस हे चौघे या कथित बलात्कार प्रकरणात आरोपी होते. 'ग्रोवलँड फोर' या नावाने ते ओळखले जात.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बलात्काराचा शिक्का लागलेले चारही आरोपी आज हयात नाहीत. अमेरिकेत शुक्रवारी झालेल्या सुनावणीला त्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. यावेळी, सत्तर वर्ष जुन्या खटल्यात त्यांना निर्दोष ठरवण्यात आलं. म्हणजेच अल्पवयीन तरुणीने केलेला बलात्काराचा आरोप खोटा असल्याचं सिद्ध झालं.

'योग्य गोष्ट करण्यासाठी कधीच उशीर होत नाही' अशा शब्दात गव्हर्नर रॉन डिसँटिस यांनी या निकालाचं महत्त्व अधोरेखित केलं. प्रत्यक्षात हे चौघे आरोपी नसून पीडित होते, असं म्हणत डिसँटिस यांनी त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली.

1949 साली तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांनंतर जमावाने 400 गोळ्या झाडून थॉमसची हत्या केली होती. हिंसक जमावाने चौघांची घरंही पेटवली होती. शेफर्डला पुनर्चाचणीला नेणाऱ्या शेरीफने (पदाधिकारी) गोळी घालून त्याची हत्या केली. ग्रीनली आणि अर्विन यांना आजन्म कारावास सुनावण्यात आला होता. 1968 मध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या अर्विनचा मृतदेह सापडला होता. तर 2012 मध्ये ग्रीनलीची हत्या करण्यात आली.

कथित बलात्काराचा आरोप करणाऱ्या नॉर्मा पॅजेट 87 वर्षांच्या आहेत. सुनावणीला हजेरी लावलेल्या नॉर्मा यांनी 'मी खोटं बोलले' अशी कबुली दिली. कुठल्याच पुराव्याशिवाय चौघांवर खटला चालवण्यात आल्याचं आता तपासात पुढे आलं. कथित आरोपींना शिक्षा सुनावणारे खंडपीठातील सर्व न्यायाधीश गौरवर्णीय होते. बलात्कार झाला नसावा, या वैद्यकीय अहवालाकडे कानाडोळा करत निकाल देण्यात आला होता.

ग्रोव्हलँड फोर केसवर आधारित 'डेव्हिल इन द ग्रूव्ह' या पुस्तकाला 2013 साली पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.