Imran Khan : भेटवस्तू खरेदी आणि विक्रीशी संबंधित प्रकरणात अटक करण्यासाठी पाकिस्तानचे (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Former Prime Minister Imran Khan of Pakistan) यांच्या निवासस्थानी पोलिस अधिकाऱ्यांचा फौजफाटा पोहोचला आहे. पोलिसांनी ट्वीटची मालिका करत घटनाक्रमाची माहिती दिली आहे. लाहोरस्थित (Lahore) त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर इम्रान खान अटक करून घेण्यासाठी गेले असता त्यांनी टाळाटाळ केली. लाहोरच्या पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 70 वर्षीय इम्रान खान यांच्या रुममध्ये गेल्यानंतर ते आढळून आले नाहीत.
सुनावणी टाळल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
मंगळवारी (28 फेब्रुवारी) इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने इम्रान खान यांच्याविरोधात पंतप्रधान असताना परदेशी मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तूंच्या बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीच्या संदर्भात सुनावणी टाळल्याबद्दल अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. दुसरीकडे इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. संसदेतील विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर खान यांना गेल्यावर्षी एप्रिलमध्ये सत्तेतून बाजूला झाले होते. माजी पंतप्रधान इम्रान खान दहशतवाद ते भ्रष्टाचारापर्यंतच्या डझनभर खटल्यांचा सामना करावा लागत आहे. आज (5 मार्च) राजधानी इस्लामाबादहून प्रवास केलेले पोलिस अधिकारी पूर्वेकडील लाहोर शहरातील खान यांच्या झमान पार्क निवासस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर पोहोचले आहेत.
कार्यकर्ते अटकेच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने जमले
दुसरीकडे, खान यांचे समर्थक आणि त्यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे कार्यकर्ते अटकेच्या निषेधार्थ शेकडोच्या संख्येने जमले आहेत. इस्लामाबादचे पोलीस महानिरीक्षक अकबर नासिर खान यांनी जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, ही टीम केवळ वॉरंट बजावण्यासाठी नव्हे तर खान यांना अटक करण्यासाठी लाहोरला गेली आहे. नसीर पुढे म्हणाले की, कायद्यानुसार, अजामीनपात्र अटक वॉरंटची पहिली पायरी म्हणजे आरोपींना नोटीस बजावणे आणि त्वरित अटक करणे. आज एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, अंतर्गत मंत्री राणा सनाउल्ला म्हणाले की, पोलिस वॉरंट बजावण्यासाठी आले आहेत आणि त्यानंतर ते न्यायालयात माहिती देतील. खान यांच्या घराबाहेर पत्रकारांशी बोलताना पीटीआय पक्षाचे नेते आणि माजी माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी पुष्टी केली की पोलिस वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी आले होते.
इतर महत्वाच्या बातम्या