बगदाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव संपण्याऐवजी आणखी वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. इराकमध्ये असलेल्या अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट हल्ले झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, एकही रॉकेट अमेरिकेच्या दूतावासावर पडलं नसून कोणतीही जीवित हानी झालेली नाही. सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतली नाही.


उच्च सुरक्षा असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये रॉकेट हल्ला


सूत्रांच्या माहितीनुसार, उच्च सुरक्षा असणआऱ्या परिसरामध्ये तीन रॉकेटच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उच्च सुरक्षा असणाऱ्या ग्रीन झोनमध्ये भागात पाच रॉकेटच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. दरम्यान, ही माहिती देताना कोणीही अमेरिकी दुतावासचा उल्लेख केला नाही. तसेच ग्रीन झोन हा भाग मध्य बगदादमध्ये आहे. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत.





इराणच्या हल्ल्यात 34 अमेरिकी सैनिक जखमी


इराणने इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता. अमेरिकेने या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याचं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर 34 सैनिक जखमी झाल्याचं मान्य केलं होतं. मंगळवारी देखील इराकमधील अमेरिकी दूतावासाजवळ दोन रॉकेट डागण्यात आले होते. यात कोणी जखमी झालं नव्हतं पण इराण आणि अमेरिकेत तणाव वाढला होता. इराणी सैन्याने काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या इराकमधील बलाद येथे असलेल्या तळांवर रॉकेट हल्ला केला होता. इराणकडून अमेरिकेच्या या तळावर एकूण 8 रॉकेट डागण्यात आली होती. यामध्ये चार जण जखमी झाले होते.


एएफपीने दिलेल्या वृत्तानुसार, इराकमधील अल बलाद एअरबेसवर अमेरिकेच्या लष्करी तळांवर एकूण 8 रॉकेट सोडण्यात आले होते. ज्यामध्ये चार जण जखमी झाले होते. अल बलाद एअरबेस इराकमधील एफ-16 विमानांचा मुख्य तळ आहे. इराकने ही विमाने अमेरिकेकडून खरेदी केली होती.


दरम्यान, इराणच्या सैन्याचे मुख्य कमांडर कासिम सुलेमानी यांना अमेरिकेने ड्रोन हल्ल्यांद्वारे ठार केले होते. त्यानंतर इराण आणि अमेरिका याच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.


संबंधित बातम्या : 


युक्रेनचं विमान चुकून पाडलं, इराणच्या लष्कराची कबुली; 178 प्रवाशांचा बळी


इराकमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा रॉकेट हल्ला, इराक सैन्याकडूनही दुजोरा


इराणवर आर्थिक निर्बंध लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा


इराणमध्ये युक्रेनचं प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त, 170 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती