लंडन : ब्रिटीश शाही घराण्यापासून वेगळे झाल्यानंतर काल पहिल्यांदा प्रिन्स हॅरीनं याबाबत मौन सोडलं आहे. आपल्याला महाराणीची आणि देशाची सेवा करायची होती. पण सार्वजनिक निधीचा वापर करायचा नव्हता आणि त्यासाठी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागला असं स्पष्टीकरण प्रिन्स हॅरीनं दिल आहे. तरी, प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कल यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर आता स्वाक्षरी केली आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेघन या दोघांनी 'हिज आणि हर रॉयल हायनेस' या उपाधीही सोडल्या आहेत. त्यामुळे आता दोघांनाही सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आता हे दाम्पत्य ब्रिटनच्या महाराणीचं अधिकृतरित्या प्रतिनिधीत्व करणार नाही. या दोघांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी निर्णयाला पाठिंबा देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रिटन आणि संपूर्ण राष्ट्रमंडळासाठी केलेल्या कामांबद्दल जोडप्याचे आभार त्यांनी आभार मानले आणि स्वंतत्र जीवन जगण्याच्या त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला. ब्रिटनच्या राणी एलीझाबेथ म्हणाल्या, 'हॅरी, मेगन आणि आर्ची आमच्या परिवाराचे कायम प्रिय सदस्य आहेत. मेगनचा मला अभिमान वाटतो. तीने लवकर कुटुंबाला आपलस करून घेतले. तसेच या दाम्पत्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत'.

घे भरारी : प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केलचा शाही विवाह सोहळा!



प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाहसोहळा मे 2018 मध्ये पार पडला होता. यानंतर त्यांना द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स हा किताब देण्यात आला होता. तर 6 मे 2019 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन विंडसर आहे.

सध्या प्रिन्स हॅरी हे राजघराण्यातील सहावे वारसदार होते. प्रिन्स हॅरी हे प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे सुपुत्र, म्हणजेच प्रिन्स विल्यम्स यांचे धाकटे बंधू. त्यांच्यानंतर हॅरी आणि मेगन यांचा पुत्र आर्ची सातव्या क्रमांकाचा वारसदार ठरतो. दरम्यान, मोठा भाऊ प्रिन्स विल्यमसोबत मतभेद असल्याची बाब प्रिन्स हॅरीने स्वीकारल्याची चर्चा होती.