कराची: पाकिस्तानच्या कराची शहरात बुधवारी (21 ऑक्टोबर) झालेल्या एका बॉम्बस्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 लोक जखमी झाले आहेत. गुलशन-ए-इकबाल परिसरातील मस्कन चौरंगी या ठिकाणी दोन मजली इमारतीत हा स्फोट झाला. यामुळे आजूबाजूच्या इमारतींचेही नुकसान झाले. या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. काही लोकांच्या मते हा सिलेंडरचा स्फोट आहे. असे असले तरी बॉंब तपास पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
कराची शहरात काल रात्री पाकिस्तानचे लष्कर आणि सिंध पोलिस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळी या परिसरात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण होते.
इम्रान खान सरकारविरोधात असंतोष
रविवारी कराचीत इम्रान खान सरकारविरोधात 11 विरोधी पक्षांच्या महागठबंधन पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेंटने मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते. त्या रॅलीचे नेतृत्व नवाज शरीफ यांची कन्या मरियम शरीफ यांनी केले होते. त्यानंतर मरियम शरिफ यांचे पती कॅप्टन मोहम्मद सफदर यांना अटक केली होती. तसेच मरियम यांच्यावरही खटला दाखल केला होता. या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्कर आणि सिंध पोलिस समोरासमोर आले होते.
गेले काही दिवस पाकिस्तानमध्ये इम्रान खान सरकार विरोधात असंतोष विरोधी पक्षात आणि लोकांत असंतोष खदखदत आहे. विरोधी पक्षांनी इम्रान खान सरकारविरोधात रान उठवलं आहे. ताज्या वृत्तानुसार सिंध प्रांताचे गव्हर्नर इम्रान इस्माईल यांच्या घराभोवतीचा परिसर लष्कराने ताब्यात घेतला आहे आणि आता या कारणावरुन सिंध पोलिस आणि लष्कर पुन्हा आमने सामने आले आहेत. सिंध पोलिसांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
याआधी एक दिवस कराचीत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराशेजारी एक बॉम्बस्फोट झाला होता. त्यात 5 लोक जखमी झाले होते. पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या स्फोटामुळे संपूर्ण पाकिस्तान हादरले आहे.