Marburg virus : पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये प्रशासनानं जीवघेण्या मारबर्ग व्हायरस (Marburg virus)चा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेत मरबर्ग व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिकेतील इबोला या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच कमी झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांतच एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आल्याचं पाहायला मिळालं होतं. दक्षिण गिनीच्या गुआकेडो प्रांतात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरतो Marburg virus
सध्या जग कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरशी लढतोय. अशातच आता कोरोनाप्रमाणेच वेगानं पसरणाऱ्या Marburg virus चा पहिला रुग्ण आफ्रिकेत आढळून आला आहे. मारबर्ग व्हायरस (Marburg virus) हा संसर्गजन्य विषाणू आहे. आफ्रिकेतील डब्ल्यूएचओ (WHO) चे क्षेत्रीय निर्देशक, मात्शिदिसो मोएती यांनी बोलताना सांगितलं की, हा व्हायरस अत्यंत घातक असून संसर्गजन्य आहे. त्यामुळे याला लवकरात लवकर थोपवणं गरजेचं आहे. सेनेगलची राजधानी डाकारमधील पाश्चर इन्स्टिट्यूटने साईटवरील प्राथमिक तपासणीची पुष्टी केली आहे. सध्या मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या रुग्णाचा शोध सुरु आहे.
डब्ल्यूएचओ (WHO) नं दिलेल्या माहितीनुसार, मारबर्ग व्हायरस वटवाघुळानं खाल्लेली फळं खाल्यानं माणवामध्ये पसरतो. मारबर्ग व्हायरसची लागण झालेल्या बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्कात आल्यानं याचा संसर्ग होतो. त्यानंतर हा व्हायरस मनुष्यापासून मनुष्यापर्यंत प्रसारित होतो.
Marburg virusची लक्षणं :
- ताप
- डोकेदुखी
- शरीरांतर्गत रक्तस्त्राव
Marburg virusच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी यांसारख्या समस्यांसोबतच शरीरांतर्गत रक्तस्त्राव यांसारख्या लक्षणांचाही समावेश आहे. डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचा मृत्यूदर 24 ते 88 टक्क्यांमध्ये आहे. तसेच या व्हायरसविरोधात प्रतिबंधक लस अद्याप उपलब्ध नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी गिनीमध्ये इबोला आजाराचा उद्रेक झाला होता, जो डब्ल्यूएचओने जूनच्या मध्यापर्यंत संपवण्याची घोषणा केली होती. गिनीमध्ये इबोला आजारामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे.