Raids On Donald Trump's House : अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी आता मोठी खुलासा झाला आहे. एफबीआयनं आण्विक कागदपत्रांसह (Nuclear Documents) इतर वस्तूंच्या शोधात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या घरावर छापा टाकल्याचं सांगण्यात येत आहे. वॉशिंग्टन पोस्टनं सूत्रांच्या हवाल्यानं हा मोठा दावा केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडा (Florida) 'मार-ए-लागो' (Mar-A-Lago) या निवासस्थानी अमेरिकन केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे FBI ने छापेमारी केली होती. यादरम्यान एफबीआयनं तिथून कागदपत्रांनी भरलेले डझनभर बॉक्स ताब्यात घेतले होते. इतकंच नाही तर एफबीआयच्या सूत्रांनी द न्यूज वीकमधून खुलासा केला आहे की, ट्रम्प घरी नसताना हे छापे मुद्दाम टाकण्यात आले होते. ट्रम्प यांच्या उपस्थितीचा कारवाईवर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता अधिकाऱ्यांना होती. तसेच, ट्रम्प या छापेमारीचा फायदा आपल्या राजकीय फायद्यासाठीही करु शकतात, अशीही शक्यता अधिकाऱ्यांना होती. त्यामुळेच ट्रम्प यांच्या अनुपस्थितीत छापेमारी करण्यात आली होती.
अधिकृत कागदपत्रांच्या शोधासाठी छापेमारी
ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर फ्लोरिडामध्ये आणलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी संबंधित अधिकृत कागदपत्रं शोधण्यासाठी एफबीआयनं छापेमारी केल्याचं यापूर्वीच सांगण्यात आलं आहे. सध्या न्याय विभाग ट्रम्प यांच्याविरोधातील दोन प्रकरणांची चौकशी करत आहे. 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल उलटवण्याच्या प्रयत्नाशी संबंधित पहिलं प्रकरण आणि कागदपत्रं हाताळण्यासंदर्भातील दुसरं प्रकरण, यासंदर्भात सध्या चौकशी सुरु आहे. एप्रिल-मे महिन्यातही तपास यंत्रणेनं या प्रकरणात ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील जवळच्या मित्रांची चौकशी केली होती.
FBI च्या मते, एजन्सी प्रेसिडेंशियल रेकॉर्ड्स अॅक्ट आणि वर्गीकृत साहित्य हाताळणी कायद्यांच्या संभाव्य उल्लंघनांची चौकशी करत आहे. नॅशनल आर्काइव्हज अँड रेकॉर्ड अॅडमिनिस्ट्रेशन (NARA) ने 2022 मध्ये व्हाईट हाऊसच्या रेकॉर्डचे 15 बॉक्स जप्त केले. हे बॉक्स 'मार-ए-लागो'ला (डोनाल्ड ट्रम्प यांचं फ्लोरिडातील निवासस्थान) पाठवले गेले. त्यावेळी NARA ने सांगितलं की, नियमांनुसार कागदपत्रांनी भरलेले हे बॉक्स ट्रम्प जेव्हा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले, तेव्हा नॅशनल आर्काइव्हजला पाठवायचे होते.
ट्रम्ह म्हणाले होते, हा तर काळा दिवस
दुसरीकडे, ट्रम्प यांनी FBI च्या छाप्याबाबत एक निवेदन जारी करून माहिती दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं की, एफबीआय अधिकाऱ्यांनी फ्लोरिडातील पाम बीचवर असलेल्या 'मार-ए-लागो'वर छापा टाकून निवासस्थान ताब्यात घेतलं होतं. ट्रम्प म्हणाले होते, "ही आपल्या देशासाठीची काळी वेळ आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबाबत यापूर्वी कधीही असं घडलं नव्हतं. हा प्रकार म्हणजे, न्याय व्यवस्थेचा शस्त्र म्हणून गैरवापर करण्यासारखं आहे."