Coronavirus : मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना महामारी संकटानं अनेकांचं जीव घेतले आहेत. जवळपास प्रत्येक देशात कोरोनामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या काही देशातील परिस्थिती सुधारत असली तरीही पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) याबाबत चिंता व्यक्त केली आहे. युरोप आणि मध्य आशियातील 53 देशात आणखी एका लाटेचा धोका असून फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती WHO ने व्यक्त केली आहे.


युरोप आणि मध्य आशियातील 53 देशात कोरोना महामारीची आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे. काही देश आधीच्याच लाटेचा सामना करत आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा मृत्यू होण्याची भिती जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय कार्यलयाचे प्रमुख डॉ. हैन्स क्लूज यांनी गुरुवारी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, या देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक वाढू लागली आहे. या देशातील वाढणारी रुग्णाची संख्या चिंतादायक आहे.  


युरोपमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते – 
डेनमार्कमधील कोपनहेगन येथे पत्रकारांशी बोलताना डॉ. हैन्स क्लूज म्हणाले की, युरोप पुन्हा एकदा कोरोना महामारीच्या केंद्रस्थानी आहे. गेल्यावर्षीही आपण महामारीच्या केंद्रस्थानी पोहचलो होतो. महामारी वाढण्याच्या टप्प्यावर आपण सध्या आहोत. गतवर्षीच्या तुलतेन कोरोना विषाणूबद्दल आपल्याला खूप काही माहिती आहे. त्यामुळे कोरोनाविरोधात लढा दिला जाईल. आपल्याकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी साहित्य अन् डॉक्टर आहेत.  


लसीकरणाची कमतरतेमुळे वाढतेय संक्रमण - 
डॉ. हैन्स क्लूज म्हणाले की, लसीकरणातील कमतरतेमुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या आठवडाभरात 53 देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे.  


फेब्रुवारीपर्यंत भयावह परिस्थिती –
फेब्रुवारी 2022 पर्यंत भयावह परिस्थिती होण्याची भिती डॉ. हैन्स क्लूज यांनी व्यक्त केली.  सध्याची स्थिती पुढील चार महिने कायम राहिली तर पाच लाख कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. साप्ताहिक कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि मृताच्या संख्येत मोठी वाढ दिसत आहे. पुढील काही दिवस यामध्ये घसरण नाही झाल्यास फेब्रुवारीपर्यंत भयावह परिस्थिती ओढावलेली असेल.