नवी दिल्ली : अंडं व्हेजिटेरियन की नॉन-व्हेज यावरुन शाकाहारी आणि मांसाहारींमध्ये अनेकदा वाद झडत असतात. मात्र संशोधकांनी या दीर्घकालीन वादावर उत्तर शोधलं आहे. शास्त्रज्ञांच्या मते अंडं हे शाकाहारी आहे.

अंडं हे कोंबडी किंवा इतर पक्ष्यांकडून म्हणजे सजीवांकडून मिळत असल्यामुळे ते नॉन-व्हेजिटेरियन असल्याचा दावा मांसाहारींकडून केला जात असे. मात्र शास्त्रज्ञांनी हा दावा खोडून काढला आहे.

संशोधकांच्या मते अंड्याचे तीन भाग असतात. अंड्याचं कवच (एग शेल), पिवळा बलक (एग योक) आणि पांढरा भाग (एग व्हाईट). पांढऱ्या भागात फक्त प्रथिनंच असतात, तर पिवळा बलक हा प्रथिनं, कोलेस्ट्रॉल आणि फॅट्सपासून बनला असतो.

आपण जी अंडी दररोज खातो, त्यामध्ये गर्भ नसतो. त्यामुळे पक्षी किंवा प्राण्याची वाढ व्हावी, इतका जीवाचा विकास झालेला नसतो.

कोंबडी सहा महिन्यांची झाली, की दर दिवशी किंवा दोन दिवसातून एकदा अंडी देते. अंडं देण्यासाठी नरासोबत तिचं मीलन होण्याची आवश्यकता नसते. अशा अंड्यांमध्ये जीव नसतो. आपण जी अंडी नेहमी बाजारातून विकत आणतो, ती अनफर्टिलाईज्ड असतात.