China Earthquake: चीनच्या (China) गान्सू (Gansu) प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के (Strong Earthquakes) जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला. गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलं की, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, अनेक इमारती कोसळल्या. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 230 हून अधिक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे सर्वात जास्त नुकसान काउंटी, डियाओजी आणि किंघाई प्रांतात झालं आहे. येथील अनेक इमारती कोसळल्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात बचाव पथकं व्यस्त आहेत. मृत आणि जखमींची संख्या वाढू शकते.


सीईएनसीनं सांगितलं की, भूकंपाचा केंद्रबिंदू 35.7 अंश उत्तर अक्षांश आणि 102.79 अंश पूर्व रेखांशावर 10 किलोमीटर खोलीवर नोंदवला गेला. आपत्कालीन सेवांनी लोकांना मदत करण्यास सुरुवात केली असून पीडितांच्या मदतीसाठी बचाव कार्य केले जात आहे.


शिन्हुआच्या अहवालानुसार, चीनचे राष्ट्रीय आपत्ती निवारण, शमन आणि मदत आयोग आणि आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने स्तर-IV आपत्ती निवारण आणीबाणी सक्रिय केली आहे. मात्र, उंचावरील भाग असल्याने येथे कडाक्याची थंडी असल्याने बचाव कार्यात अडचणी येत आहेत.


पाकिस्तानातही भूकंप 


सोमवारी पाकिस्तानातही 5.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. मात्र, यात कोणतीही हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सिस्मिक मॉनिटरिंग सेंटर (NSMC) नुसार, भूकंप 133 किमी खोलीवर झाला आणि त्याचा केंद्रबिंदू भारतातील जम्मू आणि काश्मीर होता. राजधानी इस्लामाबादसह इतर शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवलं.    


भूकंप का होतो?


पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे एकमेकांवर आदळतात तिथे भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंप होतो, प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे पृथ्वीचा वरचा भाग हादरु लागतो, कधी आठवडे तर कधी महिने. ही ऊर्जा अधूनमधून बाहेर पडते आणि भूकंपाचे धक्के जाणवत राहतात, याला आफ्टरशॉक असंही म्हणतात.