Earthquake at Nepal : नेपाळमध्ये (Nepal News) शुक्रवारी रात्री उशिरा तीव्र भूकंपानं हाहाकार माजवला. 6.4 रिश्टर स्केलच्या भूकंपानं (Earthquake Updates) नेपाळमध्ये मृत्यूतांडव पाहायला मिळालं. भूकंपात आतापर्यंत 72 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुकुम पश्चिम आणि जाजरकोटमध्ये भूकंपामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 


नेपाळमध्ये हाहाकार माजवणाऱ्या भूकंपाची तीव्रता दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात दिसली यावरून अंदाज लावता येतो. बिहारमधील पाटणा आणि मध्य प्रदेशातील भोपाळपर्यंत भूकंपाचे हलके धक्के जाणवले आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप मापन केंद्रानुसार, नेपाळच्या जाजरकोट जिल्ह्यातील लामिडांडा भागात भूकंपाचा केंद्रबिंदू होता. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी भूकंपामुळे झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी बचाव आणि मदतीसाठी 3 सुरक्षा एजन्सी तैनात केल्या आहेत. या भूकंपाचा प्रभाव उत्तर प्रदेशातील लखनौमध्येही दिसून आला, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घाबरुन घराबाहेर पडल्याचं पाहायला मिळालं. 






नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के 


नेपाळ गेल्या काही महिन्यांत बऱ्याचदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरुन निघाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबरला झालेल्या भूकंपाचं केंद्रही नेपाळमध्ये होतं. नेपाळमध्ये 4 भूकंप झाले. सकाळी 7.39 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 मोजण्यात आली. यानंतर 8 वाजून 8 मिनिटांनी 4.2 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. भूकंपाचा तिसरा धक्का सकाळी 8.28 वाजता जाणवला आणि त्याची तीव्रता 4.3 इतकी होती. यानंतर 8 वाजून 59 मिनिटांनी चौथ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले. 


भूकंप का होतो?


पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे एकमेकांवर आदळतात तिथे भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंप होतो, प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे पृथ्वीचा वरचा भाग हादरु लागतो, कधी आठवडे तर कधी महिने. ही ऊर्जा अधूनमधून बाहेर पडते आणि भूकंपाचे धक्के जाणवत राहतात, याला आफ्टरशॉक असंही म्हणतात.


दिल्ली, एनसीआर, हरियाणातही भूकंपाचे धक्के 


दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागांत भूकंपाचे जोरदार धक्के बसल्यानं पृथ्वी हादरली. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की, लोकांमध्ये भीती पसरली होती. अचानक आलेल्या या भूकंपामुळे लोक घराबाहेर पडले. हायराईज सोसायटीच्या विधानसभा परिसरातही लोक जमले होते. रात्री 11.32 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के बराच वेळ जाणवत होते. लोक जेवल्यानंतर झोपण्याच्या तयारीत असताना हे धक्के बसले. धक्क्यानंतर लोक घराबाहेर पडले. यासंदर्भातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत, ज्यामध्ये पंखे, झुंबर आणि दिवे थरथरत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 इतकी मोजली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, हा भूकंप जमिनीपासून 10 किमी खाली आल्याचं कळत आहे.