नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, 26 जून रोजी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होईल. या भेटीत एच वन बी व्हिसासंबंधित संभावित बदल आणि त्यापासून भारताला होणारं नुकसान याबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.


पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ही पहिलीच भेट आहे. मोदींचा अमेरिका दौरा द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा देईल, असं परराष्ट्र मंत्रालयाने मोदींचा दौरा जाहीर करताना सांगितलं.

दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्पही मोदींना भेटण्यासाठी उत्सुक असल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे. दहशतवाद, आर्थिक विकास आणि हिंद-प्रशांत क्षेत्रात सुरक्षेसंबंधित सहकार्याचा विस्तार करण्यासंबंधीत चर्चेसाठी ट्रम्प उत्सुक आहेत, असं व्हाईट हाऊसचे माध्यम सचिव सीन स्पाईसर यांनी सांगितलं.

व्यापार सहयोग वाढवण्यासोबतच उभय देशांच्या प्रमुखांमध्ये संरक्षण क्षेत्रासंबंधितही चर्चेची शक्यता वर्तवली जात आहे. संरक्षण क्षेत्रात अमेरिका भारताकडे सर्वात मोठा भागीदार म्हणून पाहते, असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे.

अमेरिका नवीन आव्हानांसोबतच सागरी सुरक्षा आणि पूर्व आशियातील वाढणाऱ्या दहशतवादाचा सामना करण्याचीही तयारी करत आहे, असं जेम्स मॅटिस म्हणाले होते.