BLOG : 'केम छो' असं म्हणत ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत भ्रमंतीला आणलं... ज्यांच्या येण्याच्या दहशतीनं कॅनेडातील ट्रुडो सरकार शेवटच्या घटका मोजतंय... ज्यांच्या समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर हल्ला चढवला... तेच डोनाल्ड ट्रम्प... अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झालेच.
 
रिपब्लिकन पक्षाचे ट्रम्प अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्यानंतर ज्यो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सूत्रं हातात घेतली. अमेरिका फर्स्ट असं म्हणत पुन्हा सत्तेत येणाऱ्या ट्रम्प यांनी अगदी पहिल्या दिवसापासून फाईट फाईट फाईट असा पावित्रा अवलंबला आहे.


डोनाल्ड ट्रम्प यांच्या या आक्रमक धोरणाचा संबंध क्रिप्टोकरन्सी मार्केटशी जोडला जातो. त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारण्यापूर्वी स्वत:चं मीम कॉईन $TRUMP हे लाँच केलं. यामुळं क्रिप्टो बाजारात खळबळ उडाली आहे. $TRUMP लाँच होताच त्यामध्ये 300 टक्के तेजी आल्याचं दिसून आलं. $TRUMP च्या लाँचिंगनंतर काही गुंतवणूकदार, क्रिप्टो समर्थकांनी मीम कॉईन खरेदीसाठी उत्साह दाखवला. त्यामुळे त्याचं ट्रेडिंग वॉल्यूम जवळपास $1 अब्जपर्यंत पोहोचल्याचं दिसून आलं. डोनाल्ड ट्रम्प हे क्रिप्टोकरन्सीबाबत सकारात्मक असल्याने आगामी काळात त्याला प्रोत्साहन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 




1. डोनाल्ड ट्रम्प यांचं फाईट फाईट फाईट धोरण


आता त्यांचं हे फाईट फाईट फाईट धोरण नेमकं कोणाची चिंता वाढवतंय हे त्यांच्या शपथविधी आधीच्या भाषणात दिसून आलंच. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून युद्धाच्या आगीत धुमसणाऱ्या रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात कठोर भूमिका घेणार हे स्पष्ट केलं. दुसरीकडे दीड वर्षांपासून तणाव असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धावरही त्यांनी नजर असल्यांचं त्यांच्या भाषणातून दिसून आलं. म्हणजे युरोपापासून पश्चिम आशियापर्यंत सुरु असलेल्या तणावावर ट्रम्प यांच्या शासनाची नजर असणार हे स्पष्ट दिसतंय. त्यांच्या याच भूमिकेचे जगावर काय परिणाम होणार हेही लवकरच कळेल.




2. डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदींची मैत्री


हाऊडी मोदी ते केम छो ट्रम्प... अशा कार्यक्रमांनी ट्रम्प-मोदींच्या मैत्रीचं दर्शन अवघ्या जगाला झालं. जेव्हा जेव्हा दोघं भेटतात त्यावेळी त्यांची गळाभेट नक्कीच होते. त्यामुळे त्यांच्या याच मैत्रीचा देशाला अनेक पातळ्यांवर फायदा होतोही. पण, असं असलं तरी दोन्ही देशांच्या आर्थिक धोरणांमध्ये मात्र समतोल राखण्याची गरज आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या पहिल्या टर्मपेक्षा दुसरी टर्म जास्त महत्वाची ठरणार आहे.


मूळचे उद्योपती असलेल्या ट्रम्प यांनी परराष्ट्र धोरणात काय आर्थिक आणि सुरक्षेविषयीचेच हितसंबंध जोपासलेत. त्यामुळे आता जेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तेव्हा त्याचे भारतावर विविध स्तरांवर परिणाम होऊ शकतात. 


3. ट्रम्प रिटर्न्सचे भारताच्या व्यापारावर कोणते परिणाम?


डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट धोरणामुळे संरक्षणवादाला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे भारतासोबतच्या व्यापारात अडथळे येऊ शकतात. आताच ट्रम्प यांनी कॅनडाला शुल्क वाढण्याची धमकी दिली होती. ज्याचा परिणाम तिथल्या थेट कॅनाडा सरकारवर झाला. खरंतर, ट्रम्प यांची भारतासाठी इतकं आक्रमक आणि टोकाचं धोरणं नसली तरी मात्र, पहिल्या टर्ममध्ये त्यांनी भारतीय उत्पादनावर आयात शुल्क 20 टक्क्यांवर नेल्याचीही माहिती आहे. ज्याचा परिणाम भारतीय उद्योगांवर झाला होता. आता तर ट्रम्प सरकार चीनमधून येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सवर जवळपास 60 टक्के आयात शुल्क लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या निर्णयाचा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला फायदाही होवू शकतो.




4. ट्रम्प इज बॅक... 'आयटी'वाल्यांचं काय होणार?


डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्वी H1B व्हिसावर निर्बंध आणले होते, ज्याचा भारताच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांवर परिणाम झाला होता. इतकंच नाही तर अमेरिकेत नोकरीसाठी स्थायिक झालेल्या किंवा शिक्षणासाठी तिथं असलेल्या हजारो भारतीयांनाही त्याचा परिणाम भोगावा लागला होता. आता त्यांच्या पुनरागमनाने याच निर्बंधांचा पुन्हा विचार होण्याची शक्यता आहे. कारण, मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 17 जानेवारीला याच H-1B व्हिसा संदर्भात अनेक निर्णय घेतलेत. त्यामुळे हा व्हिसा मिळण्याच्या काही अटींमध्ये शिथिलता आल्याचं दिसतंय. शिवाय विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा होवू शकतो.


दोन वर्षांपूर्वीचा म्हणजे 2023 सालचा आकडा पाहिला तर H-1B व्हिसावर 3 लाख 86 भारतीय अमेरिकेत पोहोचले होते. टक्केवारीत पाहिलं तर 2023 साली 73 टक्क्यांहून अधिक भारतीयांनी H-1B मिळवला होता. पण, डोनाल्ड ट्रम्प मात्र, H-1B व्हिसावर पुन्हा कडक निर्बंध आणू शकतात. ट्रम्प यांच्या स्थलांतर विरोधी धोरणांमुळे भारतीय विद्यार्थ्यांवर आणि व्यावसायिकांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या किंवा नोकरी करणाऱ्या भारतीयांसाठी हे आव्हानात्मक ठरू शकते.


5. ट्रम्प -मोदी मैत्रीचा यारी, होणार संरक्षण आणि रणनीती नवी भागीदारी?


डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी... यांच्याच काळात अमेरिका भारताला 'मेजर डिफेन्स पार्टनर' म्हणून पाहू लागला आहे. याच संबंधांमध्ये आताही वाढ होण्याची दाट शक्यता आहे. चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी भारताचा मुख्य भागीदार म्हणून विचार केला होता. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाने भारताला या भागात महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. 


आशिया पॅसिफिक धोरण असं म्हणण्याऐवजी ट्रम्प सरकारच्या काळात इंडो-पॅसिफिक धोरण असा उल्लेख केला जावू लागला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कायम चीनविरोधी भूमिका घेतल्याचा भारताला काही प्रमाणात फायदा झाला. चीनला रोखण्यासाठी अमेरिकेला भारताचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे ट्रम्प 2.0 मध्ये भारताला आणखी समर्थन मिळू शकते.




ट्रम्प आले... सोबत आव्हाने आणि संधीही आल्या.


आव्हाने:


1.व्यापार अडथळे
2.स्थलांतर धोरणातील कडक उपाय
3.जागतिक मंचांवर भारताला दुय्यम स्थान देण्याचा धोका.


संधी:


1.चीनविरोधी धोरणांत भारतासाठी प्रमुख भूमिका
2.संरक्षण व तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारी
3.जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान मजबूत करणे.


खरंतर, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होणं... हे भारताच्या दृष्टिकोनातून जास्त सकारात्मकच मानलं पाहिजे. त्यांच्या येण्यानं दोन्ही देशांच्या सुरक्षा संबंधांमध्ये अधिक बळकटी येईल. प्रादेशिक सुरक्षेसह आर्थिक हितसंबंधांच्या मुद्द्यांवरही फायदा होईल. आता जिथं फायदा तिथं नुकसानही होईलच. पण, त्यावरही मोदींच्या राजकीय चातुर्यांचा कस लागणार हेही तितकंच खरं आहे. तूर्तास काय... तर वेलकम ट्रम्प.. माफ करा.. पुन्हा एकदा केम छो ट्रम्प पाहण्यासाठी भारतीयांनो.. तुम्ही मात्र, तयार राहा.