मुंबई : कॉमेडियन ते राष्ट्रपती असा प्रवास करणारे युक्रेनचे नवे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की सध्या जगभर चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचं सोशल मीडियावर मोठं कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या पहिल्याच भाषणात राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नका, असा सल्ला दिला आहे.


राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी आपल्या पहिल्या भाषणात म्हटलं की, "नेत्यांनी आपल्या कार्यालयांमध्ये माझा फोटो लावू नये. कारण राष्ट्रपती आयकॉन, मूर्ती किंवा चित्र नाही. माझ्याऐवजी तुमच्या मुलांचा फोटो कार्यालयात लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी आपल्या मुलांकडे पाहा."



युक्रेनमधील जनता फुटीरतावाद्यांसोबत सुरु असलेल्या संघर्षाला वैतागली आहे. "आमचं सरकार लोकांकडून लोकांसाठी चालवलं जाणारं प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार असेल. आम्ही असा देश निर्माण करु की, ज्यामध्ये सर्वांना समान नियम, कायदे लागू होतील" असं आश्वासनही झेलेन्स्की यांनी दिलं.


विषेश म्हणजे कॉमेडियन असलेल्या झेलेन्स्की यांनी एकदा राष्ट्रपतींची भूमिकाही निभावली होती. आज मात्र ते स्वत: राष्ट्राध्यक्षपदी आहेत. झेलेन्स्की यांनी गेल्याच वर्षी त्यांच्या पक्षाची नोंदणी केली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांना मोठं यश मिळालं. झेलेन्स्की यांना 73.2 टक्के मतदान झालं आहे. त्यांनी पेट्रो पोरोशेंको यांचा पराभव केला.