बीड : ओमान या आखाती देशात झालेल्या ढगफुटीत बीडच्या माजलगावातील कुटुंब बेपत्ता झालं आहे. ओमानची राजधानी मस्कत इथे 18 मे रोजी झालेल्या ढगफुटीनंतरच्या पुरात, निवृत्त शिक्षक खैरुल्ला खान यांच्यासह कुटुंबातील सात जण बेपत्ता झाले आहेत. नोकरीनिमित्त मस्कतमध्ये असलेल्या मुलाला भेटण्यासाठी खैरुल्ला खान गेले होते.


खैरुल्ला खान (वय 52 वर्ष) हे बीड जिल्ह्यातील माजलगाव इथल्या बुखारी शाळेत शिक्षक होते. मस्कतमधील मेडिकल सेंटरमध्ये नोकरीला असलेला मुलगा सरदार खानला भेटण्यासाठी पत्नीसह ओमानला गेले होते. 18 मे रोजी खैरुल्ला खान मुलगा सरदार, सून, तीन नातवंडे आणि पत्नीसह एका कारमधून 'वादी बीन खालिद' या पर्यटनस्थळी गेले होते. पण संध्याकाळी पाचच्या सुमार अचानक वादळी वारे सुट आणि काही क्षणातच धुके पसरुन मोठा पाऊस झाला. परिसर जलमय झाल्याने वाहतूक ठप्प झाली.

गाडीला दचके बसत असल्याने मुलगा सरदार गाडीबाहेर आला. पण त्याचवेळी पाण्याचा प्रचंड झोत आणि आपल्यासोबत गाडीला घेऊन गेला. सरदार कसाबसा झाडाकडे सरकला आणि फांदीला धरुन ठेवल्याने बचावला. मात्र खैरुल्ला खान आणि अख्ख कुटुंब वाहून गेलं.

या घटनेत स्थानिकांसह अनेक पर्यटक अडकले आहेत. तर शेकडो बेपत्ता झाले आहेत. ओमान सरकारकडून हेलिकॉप्टरद्वारे शोध मोहीम सुरु आहे. दरम्यान माजलगावातील राज गल्लीत राहणाऱ्या खान कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक चिंतेत असून याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित मदतीसाठी ओमान देशाशी संपर्क साधण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.