DGCA Guidelines : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉननं (Omicron Variant) जगाची धाकधूक वाढवली आहे. ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता जगभरातील देशांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. अशातच भारतानंही ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन महत्त्वाची पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, डीजीसीएच्या वतीनं भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाइट्ससाठी नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या नव्या गाईडलाईन्सनुसार, प्रवाशांना 14 दिवसांचे सेल्फ डिक्लेरेशन द्यावं लागणार आहे. 


काय आहेत डीजीसीएच्या गाईडलाईन्स :


1. प्रवाशांना एअर सुविधा पोर्टलवर 14 दिवसांचं सेल्फ डिक्लेरेशन देणे आवश्यक आहे. म्हणजेच, प्रवासी भारतात येण्यापूर्वी कोणत्या ठिकाणांचा प्रवास करुन भारतात आले आहेत, या सर्व गोष्टींची माहिती प्रवाशांनी देणं बंधनकारक असणार आहे. 


2. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी प्रवाशाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल.


3. विमानतळावर RTPCR ची स्वतंत्र सुविधा असावी जिथे प्रवाशांची चाचणी घेता येईल.


4. कोविड प्रोटोकॉलचे योग्य पालन करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल.


दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचा प्रसार दक्षिण आफ्रिकेतून झाल्याचं निष्पन्न झालं आहे. ओमिक्रॉननं जगाची चिंता वाढवली आहे. अशातच आता दक्षिण आफ्रिकेहून येणाऱ्या विमानांवर अनेक देशांनी बंदीही घातली आहे. कोविड-19 च्या नव्या प्रकारामुळे अमेरिकेने सोमवारपासून दक्षिण आफ्रिका आणि इतर सात आफ्रिकन देशांतील यूएस नागरिकांच्या प्रवासांवर बंदी घातली आहे. 


केंद्र सरकारकडून सुधारीत गाईडलाईन्स जारी


कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. ओमिक्रॉनचे रुग्ण अनेक देशांमध्ये आढळल्यानंतर प्रत्येक देशांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. अनेक देशांनी ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. केंद्र सरकारनंही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. सुधारित गाईडलाईन्सनुसार, संसर्गाचा धोका असणाऱ्या देशातून आलेल्या आणि  लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही विमानतळावर कोरोना टेस्ट करणं अनिर्वाय असणार आहे. 


संसर्गाचा धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रवास सुरु करण्यापूर्वी 72 तास आधी कोरोना चाचणी करणं अनिर्वाय असणार आहे. तसेच भारतात विमानतळावर दाखल झाल्यानंतर पुन्हा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना क्वॉरंटाइन केलं जाणार आहे. तसेच त्यांच्यावर क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.


ओमिक्रॉनचा धोका, मुंबईत अलर्ट; व्हायरसला रोखण्यासाठी महापालिका सज्ज


कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग मुंबईत फैलावू नये, विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्ट्रॅटेजी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार काही नियम तयार करण्यात आल्या असून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 


विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे. मागील 15 दिवसांमध्ये आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याचे आढळल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने सात दिवसांसाठी संस्थात्मक विलगीकरण केले जाणार  आहे. विलगीकरणासाठी 2 स्टार, 3 स्टार, 5 स्टार हॉटेल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. संस्थात्मक विलगीकरणाच्या कालावधीनंतरही 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. मुंबई महापालिकेचे रिचर्डसन अॅन्ड क्रुडास कोविड सेंटर  हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरता राखीव असणार आहे.