कोपनहेगन, डेन्मार्क : व्होडकाची जगातली सर्वात महागडी बाटली चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमध्ये हा प्रकार घडला आहे. सोने-चांदीने मढवलेल्या व्होडकाच्या बाटलीची किंमत 1.1 मिलियन युरो म्हणजे तब्बल साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.


तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करुन ही वैशिष्ट्यपूर्ण बाटली तयार करण्यात आली होती. 1912 च्या ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. जगभरात गाजलेल्या 'हाऊस ऑफ कार्ड्स' या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती.

राजधानी कोपनहेगनमध्ये व्हेस्तेरब्रो हा अत्यंत गजबजलेला रोड आहे. या रस्त्यावर असलेल्या 'कॅफे 33' या बारमध्ये ही बाटली ठेवण्यात आली होती. तिथून चोरट्याने ही बाटली लंपास केली.

बार बंद झाल्यानंतर रात्री चोर बारमध्ये शिरला आणि बाटली चोरल्याची माहिती बारमालकाने दिली. फेसबुकवरील एका पोस्टमध्ये व्होडकाची बॉटल चोरणारी मुखवटाधारी व्यक्ती दिसत आहे.

रशियातील महागड्या कार आणि व्होडका तयार करणाऱ्या 'डार्ट्झ फॅक्टरी'तून बाटली आणली होती. गेल्या सहा महिन्यांपासून ती आपल्या संग्रहात होती, अशी माहितीही बारमालकाने दिली आहे.