Sri Lanka Crisis : श्रीलंकेमधील (Sri Lanka) आथिक संकट दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललं आहे. इंधनाचा (Fuel Shortage) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील पेट्रोल पंपावर पाच दिवस रांगेत उभा असलेल्या एका 63 वर्षीय ट्रक चालकाचा मृत्यू झालाय. इंधनासाठी रांगेत उभा राहिलेल्या दहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्जबाजारी श्रीलंकेत इंधन खरेदीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यामुळे गुरुवारी 10 वा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, अंगुरुवाटोटा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी रांगेत उभा असलेल्या ट्रकमध्ये चालक मृतावस्थेत आढळला.
डेली मिरर वृत्तपत्रानुसार, रांगेत आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या आता 10 वर गेली आहे. सर्व बळी 43 ते 84 वयोगटातील पुरुष आहेत. रांगेत उभ्या राहिलेल्या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत.
एक आठवड्यापूर्वी कोलंबोमधील पनादुरा येथील पेट्रोल पंपावर अनेक तास रांगेत उभे असताना एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा
श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडील परकीय चलनाचा साठा संपल्याने श्रीलंकेला इतर देशांकडून इंधनाचा साठा मागवण्यातही यश मिळत नाहीय. पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध नसल्यामुळे श्रीलंकेतील लोकांना इंधन घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर लांबच लां रांगा लावाव्या लागत आहेत.
इंधनाच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात 10 तास वीज कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार इंधनाची 'रेशनिंग' यंत्रणा राबवण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत वाईट
श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला इंधनाचा तुटवडा, अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि औषधांचा तुटवडा आहे. इंधन आयातीसाठी सरकारी मालकीच्या बँक ऑफ सिलोनला क्रेडिट पत्र जारी करण्यात सरकारच्या अक्षमतेमुळे सध्याची कमतरता वाढली आहे.