Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री उशिरा झालेल्या भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला असून 1500 लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपमंत्री मौलवी शरफुद्दीन यांनी याबाबत माहिती दिली आहे.  


भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानमध्ये देखील जाणवले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली असून यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता. 


या भूकंपामुळे अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1500 लोक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या पक्तिका आणि खोस्त प्रांतात हा भूकंप झाला.






भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो.   इस्लामाबादसह इतर शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.  


दरम्यान, याआधी शुक्रवारी पाकिस्तानमध्ये भूकंप झाला होता. त्यावेळी इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतानमध्ये हे धक्के जाणवले. फैसलाबाद, अबोटाबाद, स्वात, बुनेर, कोहाट आणि मलकांडी येथेही हे धक्के जाणवले.


पाकिस्तानच्या सीमेजवळील पक्तिका प्रांतातून आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडिओंमध्ये पीडितांना हेलिकॉप्टरने या भागातून बाहेर काढताना दिसत आहे. ऑनलाइन फोटोंमध्ये अनेक घरे पडताना दिसत आहेत. त्याचबरोबर स्थानिक लोकही ढिगारा हटवताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत.


आंतरराष्ट्रीय समुदाय अफगाणिस्तानपासून दूर 
 अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबानने देशाचा ताबा घेतल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानपासून स्वतःला दूर केले आहे. भूकंपामुळे अफगानिस्तानातील परिस्थिती गंभीर झाली आहे. परंतु, आता आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानपासून स्वत:ला दूर ठेवल्यामुळे अफगाणिस्तानसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. 38 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या अफगाणिस्तानमध्ये बचाव कार्य पार पाडणे खूप कठिण झाले आहे.