Sri Lanka Presidential Election : श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) शर्यतीत बाहेर पडले आहेत. त्यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर आता राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा (Dallas Alahapperuma) यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. रानिल विक्रमसिंघे सध्या कार्यवाहक राष्ट्रपती आहेत. त्यांच्या विरुद्ध एसएलपीपी (Sri Lanka Podujana Peramuna) खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे उमेदवार आहेत.


विरोधी पक्षनेते साजिथ प्रेमदासा (Sajith Premadasa) राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण आता त्यांच्यासमोर डलास अलाहाप्पेरुमा यांचं आव्हान असेल. डलास अलाहाप्पेरुमा सध्याचा सत्ताधारी पक्ष एसएलपीपी म्हणजेच राजपक्षे यांच्या पक्षाचे खासदार आहेत. डलास अलाहाप्पेरुमा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ते रानिल विक्रमसिंघे यांना समर्थन देतील अशी चर्चा होती.


कोण आहेत डलास अलाहाप्पेरुमा?
डलास अलाहाप्पेरुमा हे राजपक्षे यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. त्यावेळी रानिल विक्रमसिंघे पंतप्रधान होते. आता बदलत्या समीकरणांमध्ये डलास अलाहपेरुमा यांनी रानिल विक्रमसिंघे यांच्या उमेदवारीला आव्हान दिलं आहे. डलास यांनी राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रवेश केल्यामुळे, आता राजपक्षे कुटुंबाचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसएलपीपीमध्ये फूट पडू शकते, असे झाल्यास रानिल विक्रमसिंघे यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण होईल.


भारताच्या मदतीने श्रीलंकेचा संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न


श्रीलंकेत आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे, तेव्हापासून भारत हा एकमेव देश आहे जो श्रीलंकेला सातत्याने मदत करत आहे. यामुळे श्रीलंकेतील जनता आणि सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारला सातत्याने आवाहन करत आहे. बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपली भूमिका बदलू नये, असं आवाहन श्रीलंकेनं केलं आहे. कारण भारताच्या मदतीने श्रीलंका या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या