Dalai Lama : तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा (Dalai Lama) यांनी तिबेटच्या (Tibet) समस्यांबाबत चीनसोबत संवाद साधण्याची तयारी दाखवली आहे. दिल्ली आणि लडाखच्या दौऱ्यापूर्वी दलाई लामा यांनी धर्मशालामध्ये पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'आता चीन त्यांच्याशी संपर्क करु इच्छित आहे.'


दलाई लामा यांनी म्हटलं की, 'मी चीनसोबत संवाद साधण्यास तयार आहे. आता चीनला सुद्धा कळाले आहे की तिबेटीयन लोकांच्या भावना या मजबूत आहेत. म्हणूनच तिबेटच्या समस्यांना तोंड देण्यासाठी त्यांना माझ्याशी संपर्क साधायचा आहे. त्यासाठी मीसुद्धा तयार आहे.'


'आमचा स्वातंत्र्यासाठी हट्ट नाही'


दलाई लामा यांनी म्हटलं की, 'आम्ही स्वातंत्र्याची मागणी नाही करत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ठरवलं आहे की आम्हाला चीनचा भाग बनयाचं आहे. आता चीनमध्ये अनेक बदल होत आहेत. तसेच चीनचे अधिकारी औपचारिक किंवा अनपौचारिक पद्धतीने मला संपर्क करु इच्छितात. चीन हा ऐतिहासिकदृष्ट्या बौद्ध देश आहे.' 'मी ज्यावेळी चीनचा दौरा केला तेव्हा मी तिथली अनेक मंदिरं, मठ देखील पाहिली', असं तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा म्हणाले आहेत.


दलाई लामा यांनी साजरा केला त्यांचा 88 वा वाढदिवस


14 वे दलाई लामा तेनजिन ग्यात्सो यांचा जन्म 6 जुलै 1935 रोजी ईशान्य तिबेटच्या ताकस्तेर भागात झाला. तसेच यावर्षी त्यांनी त्यांचा 88 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी दलाई लामा यांनी म्हटलं होतं की, 'तिबेटी संस्कृती आणि धर्माच्या ज्ञानाचा फायदा जगाला होऊ शकतो.' तसेच मी इतर सर्व धार्मिक परंपरांचा देखील आदर करतो असं त्यांनी म्हटलं होतं. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं होतं की, 'मी 100 वर्षांपेक्षा अधिक काळाचे जीवन जगणार असल्याची अपेक्षा करत आहे.' त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.


बौद्ध धर्माचे गुरु दलाई लामा यांना तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर 31 मे 1959 रोजी भारतात आश्रय देण्यात आला. दलाई लामा हे तिबेटी लोकांचे आध्यात्मिक गुरू आहेत आणि तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. 'दलाई लामा' हे शीर्षक मंगोलियन शब्द 'दलाई' म्हणजे महासागर आणि तिबेटी शब्द 'लामा' म्हणजे गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचे संयोजन आहे. दलाई लामा हे तिबेटचे 14 वे धर्मगुरू असून त्यांचे मूळ नाव हे तेन्झिन ग्यात्सो असं आहे.