नवी दिल्ली: आपलं घर असावं, लहानसं का असेना पण हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न. पण, हे स्वप्न साकारत असताना घर घेण्यासाठी होणारा खर्च विचारात आला की स्वप्नांनाही वेसण घालावं लागतं. अशातच सध्या एक बातमी साऱ्या जगाचं लक्ष वेधत आहे, कारण इथं चक्क बारा रुपये, खरंतर पूर्ण बारा रुपयांपेक्षाही कमी दरात घरांची विक्री करण्यात येत आहे. हीच बाब अनेकांना थक्क करुन जात आहे. काहींचा तर यावर विश्वासच बसत नाहीये, पण हे खरंय. 


उत्तर क्रोएशियामधील ग्रामीण भागात सध्या सध्या अनेकजण राहती घरं सोडून चालले आहेत. त्यामुळं इथं आता निर्मनुष्य आणि एकांतात असणाऱ्या घरांची विक्री 1 कुना म्हणजेच भारतीय प्रमाणानुसार 11.83 रुपयांना विकली जात आहेत. नव्या रहिवाशांना आकर्षित करण्यासाठी काही अटींसह ही ऑफर देण्यात आली आहे. 


क्रोएशियाच्या उत्तरेकडे असणाऱ्या, 62 चौरस किलोमीटरच्या भूभागावर पसरलेल्या लेग्राड या शहरानं सध्या तेथे होणाऱ्या घरांच्या विक्रीमुळे लक्ष वेधलं आहे. सहसा भारतात लेग्राडइतक्या शहराची लोकसंख्या लाखोंच्या घरात असते. पण, इथं मात्र सद्यस्थितीला फक्त 224 नागरिकच राहत आहेत अशी माहिती समोर आली आहे. 


लेग्राडचे महापौर इवान साबोलिया सांगतात की शहरात दळणवळणाच्या सुविधा नसल्यातच गणणं योग्य असेल. या शहराची लोकसंख्या कमी होऊ नये यासाठी इथल्या घरांची इतक्या कमी दरात विक्री केली जात आहे. आतापर्यंत इथली 17 घरं विकली गेली आहेत. घरांची किंमत कमी असली तरीही त्यांची विक्री एका करारपत्राअंतर्गत करण्यात येत आहे. ज्यामध्ये घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 15 वर्षे इथंच राहण्याची अटही नमूद करण्यात आली आहे. 


लेग्राडच्या सीमा हंगेरीशी जोडल्या गेल्या आहेत. इथं चारही बाजूंना जंगलाचा वेढा आहेय जवळपास 100 वर्षांपूर्वी अॅस्ट्रो आणि हंगेरियन साम्राज्यामध्ये फूट पडल्यानंतर इथली लोकसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली आहे. हल्लीच इथली 19 कुटुंब शहर सोडून जाग्रेब येथे स्थलांतरीत झाले. ही घरं कोणी खरेदी करु इच्छित असल्यास शासन त्यांची डागडुजी करुन देत आहे, शिवाय इथं नव्यानं आयुष्याची सुरुवात करण्यासाठी 35 हजार कुना म्हणजेच 3 लाख रुपयेही देत आहे.


Himalayas : अंतराळातून असा दिसतो पर्वतराज हिमालय; दृश्य पाहून नेटकरी अवाक्


काही दिवसांतच घरातून निघून जातात परदेशी नागरिक 


विक्री केल्या जाणाऱ्या घरांच्या किमती अतिशय नगण्य आहेत. किंबहुना घरं मोफत मिळत आहेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, असं असलं तरीही महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार ही घरं खरेदी केली जातात, परदेशी नागरिक इथं राहायलाही येतात. पण, काही दिवसांतच इथून निघूनही जातात. त्यामुळंच इथं घर खरेदी करणाऱ्यांना आता 15 वर्षांचा करार करावा लागत आहे. जेणेकरुन लोक इथेच स्थिरावून शहराला पुन्हा नवसंजीवनी मिळू शकेल.