Coronavirus Outbreak in China : जगभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गामुळे चिंता वाढली आहे. चीनमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत, तसेच मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही (Corona Patient Death) अधिक आहे. चीनमध्ये कोरोना मृतदेहाचा खच पडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. चीनमधील कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती दाखवणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख (WHO Chief) टेड्रोस अधानोम गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी चिनी अधिकार्‍यांची भेट घेतली आणि चीनमधील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल वास्तविक माहिती मागितली आहे.


चीनमधील परिस्थिती चिंताजनक


WHOचे प्रमुख प्रमुख टेड्रोस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना कोरोना बाधितांवर उपचार आणि लसीकरणासाठी चीनला योग्य ही मदत करेल. चीनमधील ढासळलेली आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी WHO कडून मदत दिली जाईल. कोरोना विषाणूचा जास्त धोका असलेल्यांना लसीकरण करण्याचं आवाहनही टेड्रोस यांनी केलं आहे.


चीनमधील ढासलेल्या आरोग्य व्यवस्थेला WHO मदत करणार


जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी चिनी अधिकार्‍यांची भेट घेतली आणि चीनमधील कोरोना महामारी आणि सध्याच्या परिस्थितीबद्दल विशिष्ट आणि वास्तविक अहवाल मागवला आहे. WHO च्या वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती दिली आहे.


WHO ने उच्च-स्तरीय बैठकीत जेनेटिक सीक्वेंसिंग डेटा, रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण, अतिदक्षता विभागातील रुग्ण (ICU) आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू यासंबंधित चीनकडून सर्व डेटा मागितला आहे. नागरिकांना विशेषत: 60 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या लसीकरणाबद्दलही अहवाल मागवला आहे. डब्ल्यूएचओकडून कोरोनाचा धोका पाहता वारंवार लसीकरणाचं महत्त्व सांगितले जात आहे. नागरिकांना लसीकरणासाठी आणि बूस्टर डोस घेण्यासाठी आवाहन केले जात आहे.


WHO प्रमुखांची चिनी अधिकाऱ्यांसोबत बैठक


चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोग आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंध प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) चीनमधील कोरोनाविरोधा लढण्यासाठीची सध्याची तयारी आणि उपाययोजना यांची माहिती दिली. कोरोना संसर्ग, कोरोना व्हेरियंट निगराणी ठेवणे, लसीकरण, आरोग्य विषयक उपाययोजना, संशोधन आणि विकास यासंदर्भातील माहिती दिली.


पुढील वर्षी कोरोना साथीला यापुढे जागतिक आरोग्य आणीबाणी मानलं जाणार नाही, अशी आशा गेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओ प्रमुखांनी व्यक्त केली होती. पण, त्यानंतरच चीनमधून रोज लाखो नवीन रुग्णांनी नोंद होत आहे. चीनमधील शांघाय आणि बीजिंगसह मोठी शहरे वेगाने कोरोना संसर्गाच्या विळख्यात येत आहेत.