मुंबई : कोरोनाविरोधातल्या लढ्यात जग आणखी एक पाऊल पुढे गेलंय. काल म्हणजे 27 जुलैपासुन अमेरिकेत संशोधन सुरु असलेल्या मॉडर्ना कंपनीच्या लशीच्या चाचणीतला शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. या शेवटच्या टप्प्यात आता 30 हजार लोकांना ही लस दिली जाणार आहे. या चाचणीचे निष्कर्ष लवकरात लवकर जर सकारात्मक आले तर मात्र ही लसदेखील डिसेंबरपर्यंत बाजारात आणण्याचा मॉडर्ना कंपनीचा प्रयत्न असेल.


मॉडर्नाच्या अभ्यासात अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थनेही सहभाग घेतला आहे. तसेच अमेरिकन सरकारने या संशोधनासाठी कोट्यवधी डॉलर्सची आर्थिक मदतही देऊ केली आहे. त्यामुळेच हा शेवटचा टप्पा सुरु होताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही ट्विटरवरुन ही माहिती दिली. मुळात ऑक्सफर्डच्या लस चाचणीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष जाहीर होण्याच्या काही दिवस आधी मॉडर्नाने त्यांच्या लशीच्या पहिल्या दोन टप्प्यांचे निष्कर्ष जाहीर केले होते. पण त्याचवेळी तिसरा टप्पा सुरु करण्याची तारीख मात्र 27 जुलै अशी ठरवण्यात आली होती.


मॉडर्नाच्या कालपासून सुरु झालेल्या तिसऱ्या टप्प्यात 30 हजार लोकांना ही लस दिली जाणार आहे. अमेरिकेतल्या 89 वेगवेगळ्या ठिकाणी ही चाचणी होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे निष्कर्ष नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित आहेत, अशी माहिती साथीच्या रोग विभागाचे प्रमुख डॉ. फाऊची यांनी दिली आहे. मॉडर्ना आणि फायझर या दोन्ही फार्मा कंपन्यांनी या लशीचे कोट्यवधी डोस तयार करायला सुरुवात केली आहे.


वर्षअखेरीस 50 कोटी डोस तयार असतील, असं मॉडर्नातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे या लशीचा फायदा सर्वात आधी अमेरिकेला होणार असला तरी 2021 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात ही लस सर्वत्र बाजारात उपलब्ध असेल असा अंदाज आहे. ऑक्सफर्ड आणि मॉडर्नाच्या यशामुळे गेले पाच महिने कोरोना नावाच्या अदृश्य शत्रूच्या लढ्यात आता एक आशेचा किरण दिसू लागला आहे. यापैकी कुठलीही लस बाजारात आली तरी ती आपल्या देशाला आधी मिळावी, यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करणार आहे. त्यामुळे एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांपर्यंत लस लवकर पोहोचू शकणार आहे.


संबंधित बातम्या






Corona vaccine | कोरोनावरील Covaxin लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात