नवी दिल्ली : दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे AIIMS मध्ये कोरोना वॅक्सिन COVAXIN चं ह्युमन ट्रायल सुरु झालं आहे. वॅक्सिनचा पहिला डोस 30 वर्षीय व्यक्तीला देण्यात आला आहे. भारत बायोटेक ही कंपनी हे वॅक्सिन तयार करत आहे. पहिल्या टप्प्यात 375 व्हॉलिंटियर्सना हे वॅक्सिन दिलं जाणार आहे. दिल्लीतील एम्समध्ये 100 व्हॉलिंटियर्सवर ट्रायल होणार आहे. यापैकी 50 जणांना सध्या वॅक्सिन दिली जाणार आहे.


पहिला डोस दिलेल्या व्हॉलिंटियरला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. पुढचे सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. COVAXIN व्हॅक्सिनचा हा पहिलाच डोस आहे. सुरुवातीच्या टेस्टनंतर या 30 वर्षीय व्यक्तीला वॅक्सिनच्या पहिल्या डोससाठी निवडण्यात आलं होतं. एक हजारहून अधिक जणांनी व्हॉलिंटिअर बनण्यासाठी संपर्क साधला होता.


हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून COVAXIN लस तयार केली जात आहे. या कंपनीला आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीकडूनही मदत केली जात आहे. COVAXIN च्या ट्रायलसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या 12 ठिकाणांची निवड केली आहे. यापैकी दिल्लीतील एम्स एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व 12 ठिकाणांवरील एकूण 750 जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.


एम्सच्या डॉ. संजय राय यांनी म्हटलं की, दिल्लीतील रहिवाशी व्यक्तीची दोन दिवसांपूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या व्यक्तीला कोणताही इतर आजार नव्हता. इजेक्शनने 0.5 मिलीलीटरच डोस दुपारी 1.30 वाजता देण्यात आला आहे. अजून तरी कोणताही साईड इफेक्ट दिसलेला नाही. संबंधित व्यक्ती दोन तास डॉक्टरांच्या देखरेखी खाली होती. आणि आता पुढील सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल.


Corona vaccine | कोरोनावरील Covaxin लसीच्या चाचणीला भारतात सुरुवात