फ्लोरिडा : जगभ्रमंती करण्याचं स्वप्न उराशी बाळगून एका अमेरिकन दाम्पत्याने बोट विकत घेण्याचा निर्णय घेतला. घरदार विकून पैसा उभा केला, सर्व सुविधांनी युक्त बोट 5 हजार डॉलर्सना (अंदाजे सव्वा तीन लाख रुपये) विकत घेतली. मात्र अवघ्या दोनच दिवसात बोट समुद्रात बुडाली आणि त्यांच्या स्वप्नावर पाणी पडलं.


26 वर्षीय टॅनर ब्रॉडवेल आणि 24 वर्षीय निक्की वॉल्श यांनी गेल्या आठवड्यात 28 फूट लांब सेलबोट विकत घेतली. फ्लोरिडातील टार्पन स्प्रिंग्समधून त्यांनी जगभ्रमंती सुरु करण्याचा निश्चय केला.

फोटो सौजन्य : निक्की वॉल्श

दोन वर्षांपासून ते जगप्रवासाचा आराखडा तयार करत होते आणि पैशांची बचत करत होते. टॅनरने जास्तीचे पैसे कमवण्यासाठी उबर टॅक्सीही चालवली. एप्रिल 2017 मध्ये त्यांनी गाडी आणि इतर सामान विकलं. लॅग्निआपे नावाची 1969 मधील बोट त्यांनी 5 हजार डॉलर्सना विकत घेतली.

टॅनर मूळ फ्लोरिडाचा रहिवासी असून मार्केटिंग कंपनीत कार्यरत होता. कामानिमित्त फिलाडेल्फियात गेला असताना त्याची भेट निक्कीशी झाली. मॉडर्न लाईफस्टाईलचा कंटाळा आल्यामुळे जगप्रवासाचा बेत आखल्याचं दाम्पत्याने सांगितलं.

सेलिंगचा अनुभव नसल्यामुळे टॅनरच्या वडिलांकडून त्यांनी महिन्याभरात बोट चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. कॉन्फिडन्स आल्यावर त्यांनी हा प्रवास सुरु करण्याचा दिवस निश्चित केला. टॅनर-निक्कीला त्यांच्या मित्रांनी भव्य सेंड ऑफही दिला.

बोटीची अंतर्गत रचना (फोटो सौजन्य : निक्की वॉल्श)

ठरल्याप्रमाणे प्रवासाला सुरुवात झाली. पहिला दिवस चांगला गेला. मात्र दुसऱ्याच दिवशी मेक्सिकोत मदिरा बीचपासून 25 मैलांवर ही बोट बुडाली. पाण्याखाली एका अज्ञात वस्तूला धडकून बोटीला भोक पडलं आणि आत पाणी शिरायला लागलं. त्यामुळे बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या दुर्घटनेतून टॅनर, निक्की आणि त्यांचा दोन वर्षांचा कुत्रा रेमी वाचले. काही महत्त्वाची कागदपत्रं, मोबाईल फोन, डॉग फूड आणि कपडे इतकंच सामान त्यांच्या हाती उरलं. अवघ्या 20 मिनिटांत होत्याचं नव्हतं झाल्याची भावना टॅनरने व्यक्त केली आहे.

फोटो सौजन्य : निक्की वॉल्श

बोट अद्यापही पाण्यात असून ती हटवण्यास 10 हजार डॉलर म्हणजेच बोट खरेदी किमतीच्या दुप्पट खर्च येईल, असं कोस्टगार्डने सांगितलं. दाम्पत्याकडे आता अवघे 90 डॉलर शिल्लक राहिले आहेत.

आता पुन्हा नोकरीकडे वळण्याशिवाय पर्याय नसल्याचं निक्की-टॅनर सांगतात. मात्र आपलं स्वप्न अजूनही जिवंत आहे, ते नक्की पूर्णत्वास नेणार, अशी अभिलाषाही त्यांनी व्यक्त केली आहे.