मुंबई : जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताना दिसत असून गेल्या 24 तासात तब्बल 25 लाख रुग्णांची भर पडली आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्णसंख्या सापडत असून एकाच दिवसात 7.5 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात सहा देशांमध्ये एक लाखांहून जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 7.51 लाख रुग्ण सापडले असून त्यानंतर फ्रान्समध्ये 2.61 लाख, इटलीत 2.19 लाख, ब्रिटनमध्ये 1.79 लाख, भारतात 1.14 लाख आणि अर्जेंटिनामध्ये 1.09 लाख कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जगभरात आतापर्यंत 54.89 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 


जगभरातील कोरोनाची स्थिती



  • एकूण संक्रमित- 30 कोटी

  • बरे झालेले रुग्ण- 25.74 कोटी

  • अॅक्टिव्ह रुग्ण- 3.78 कोटी

  • एकूण मृत्यू- 54.89 लाख 


दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष करू नका, गांभीर्यानं घ्या असा सल्ला दिला आहे. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होत आहेत आणि अनेकांचा जीवही जात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा इशारादेखील जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. लसीकरण झालेल्यांनाही ओमायक्रॉनची लागण होतेय, पण अशा रुग्णांना त्याचा धोका कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं.


डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडनॉम घेबियस यांनी गुरुवारी म्हटलं की, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत कमी गंभीर आहे. विशेषतः लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांसाठी हा कमी गंभीर ठरतो. पण तरीही ओमायक्रॉनला सौम्य समजणं चूक असेल. 


महत्त्वाच्या बातम्या :