Corona in India: भारतात धडकलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर अद्यापही वाढतच चालला आहे. दर दिवशी नव्या रुग्णांचा विक्रमी आकडा आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येत असल्यामुळं आरोग्य यंत्रणांपुढे असणारी आव्हानंही दिवसागणिक वाढत चालली आहेत. अशातच आता भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. 


सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे. 


ब्रिटनमध्ये भारतीय प्रकारच्या संसर्गाचे 103 रुग्ण 


ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हँकॉक यांनी 'हाउस ऑफ कॉमन्स'मध्ये दिलेल्या माहितीनुसार तिथं भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचं नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत. 


दरम्यान, सदर निर्णयाच्या काही तासांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा पुढील आठवड्यातील नियोजित भारत दौराही रद्द करण्यात आल्याची घोषणा केली. 


काय आहे भारतातील कोरोना परिस्थिती ? 


देशात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशात दररोज नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रम नोंद होत असून मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 2 लाख 61 हजार 500 नव्या कोरोना बाधितांचा आकडा समोर आला आहे. तसेच कोरोनामुळे 1 हजार 501 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात दिलासा देणारी बाब म्हणजे, देशात गेल्या 24 तासांत 1,38,423 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.