नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. जगभरातील लोक कोरोनामुळं परेशान आहेत. त्यातच आता कोरोनाचे नवे प्रकार देखील येत आहेत. कोरोनावर लसींचा शोध लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण देखील सुरु आहे. यातच आता नवीन प्रकार समोर येत असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची शिफारस केली आहे.


डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबद्दल सांगताना म्हटलं आहे की, एस्ट्राजेनेका लसीचा वापर त्या देशात देखील करावा जिथं कोरोनाचा नवा प्रकार समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा नवीन प्रकार समोर आला आहे. त्यासाठी कोणती लस वापरावी याबद्दल शंका होती.


जगभरात या तज्ञ समितीच्या सल्ल्यांचा उपयोग वैद्यकीय अधिकारी करत असतात. मात्र हा सल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रासाठी डब्ल्यूएचओकडून मंजूरी आहे असं नाही. ही मंजूरी शुक्रवारी आणि सोमवारी डब्ल्यूएचओ समूहाच्या बैठकीनंतर मिळू शकते, अशी माहिती आहे. या बैठकीत एस्ट्राजेनेका लसीच्या वापराबाबत अंतिम निर्णय होणार आहे.


भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश
भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश बनला आहे. भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे जिथे अवघ्या 21 दिवसात 50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अमेरिकेत 24 दिवसांत 50 लाख लोकांना लस देण्याचा टप्पा गाठला होता. तर ब्रिटनमध्ये 43 आणि इस्रायलमध्ये 45 दिवसांत 50 लाख लोकांना कोरोना लस दिली गेली. देशभरात कोविड 19 लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून यशस्वीपणे सुरू आहे. लसीकरण मोहिमेच्या 21 व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत सुमारे 53 लाख नागरिकांना कोरोना लस डोस देण्यात आला आहे. 21 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3.31 लाख आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली.