नवी दिल्ली : भारत सर्वात जलद गतीने कोरोना लसीकरणाचा 50 लाखांचा टप्पा गाठणारा जगातील पहिला देश बनला आहे. भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे जिथे अवघ्या 21 दिवसात 50 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अमेरिकेत 24 दिवसांत 50 लाख लोकांना लस देण्याचा टप्पा गाठला होता. तर ब्रिटनमध्ये 43 आणि इस्रायलमध्ये 45 दिवसांत 50 लाख लोकांना कोरोना लस दिली गेली.
देशभरात कोविड 19 लसीकरण अभियान 16 जानेवारीपासून यशस्वीपणे सुरू आहे. लसीकरण मोहिमेच्या 21 व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत सुमारे 53 लाख नागरिकांना कोरोना लस डोस देण्यात आला आहे. 21 व्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 3.31 लाख आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली.
लस घेतल्यानंतर 27 जण रुग्णालयात दाखल
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, कोरोना लसीकरणानंतर एकूण 27 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 21 व्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता लागली नाही. आतापर्यंत 27 पैकी 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र यापैकी कोणताही मृत्यू औपचारिकरित्या कोविड-19 लसीकरणाशी संबंधित नाही.
मार्चपासून 50 वर्षांवरील लोकांना लस दिली जाणार
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लोकसभेत सांगितले की, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्याची प्रक्रिया मार्चच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यापासून सुरू होऊ शकते. देशात सात लसांवर काम सुरू असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली. यातील तीन लस क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. दोन लस चाचणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात असून दोन लस पूर्व-क्लिनिकल टप्प्यात आहेत.
कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. यानंतर सुमारो दोन कोटी फ्रन्टलाईन वर्कर्सना ही लस दिली जाणार आहे. या तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन वर्कर्सच्या लसीकरणासाठी खर्च सुमारे 480 कोटी आहे.