कराची : इफ्तारपूर्वी जेवल्याने आणि खाद्यपदार्थ विकल्यामुळे पाकिस्तानात एका हिंदू व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर या मारहाणीविरोधात कॅम्पेन चालल्यानंतर पोलिसांना बेड्या पडल्या आहेत.
पाकिस्तानातल्या दक्षिण सिंध भागातील घोटकी जिल्ह्यातल्या हयात पिताफी या दुर्गम गावात हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिस हवालदार अली हुसेन याने 80 वर्षीय गोकल दास यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.
रमदानमध्ये मुस्लीम धर्मीय व्यक्ती सूर्यास्ताच्या वेळी त्यांचा उपवास सोडतात. या इफ्तारपूर्वीच गोकल दास यांनी जेवणविक्री केल्याने पोलिसाचा पारा चढला आणि त्याने मारहाण केल्याचं आणि जमिनीवर ढकलल्याचं सांगितलं जातं.
विशेष म्हणजे सिंध प्रांतात हिंदू नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर हे प्रकरण उचलून धरल्यानंतर कारवाई करण्यात आली.