China Released New Map: चीन (China) आपल्या कृत्यांपासून परावृत्त होत नाही. चिनी सरकारनं सोमवारी (28 ऑगस्ट) अधिकृतपणे एक नवा नकाशा जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारताचा अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh)  आणि अक्साई चीन (Aksai Chin) हा आपला प्रदेश म्हणून घोषित केला आहे. तसं पाहायला गेलं तर, चीननं भारताच्या भूभागावर हक्क सांगण्याची ही पहिलीच वेळ नाही. चीननं या वर्षाच्या एप्रिल महिन्यातच त्यांनी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावं बदलण्यास मंजुरी दिली होती.


ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, नव्या नकाशात भारताच्या काही भागांव्यतिरिक्त चीननं तैवान आणि वादग्रस्त दक्षिण चीन सागराचाही चीनच्या भूभागात समावेश केला आहे. नकाशात चीननं नाइन-डॅश लाईनवर आपला दावा सांगितला आहे. अशा प्रकारे त्यांनी दक्षिण चीन सागराच्या मोठ्या भागावर दावा केला आहे. दरम्यान, व्हिएतनाम, फिलीपिन्स, मलेशिया आणि ब्रुनेई दक्षिण चीन समुद्राच्या क्षेत्रांवर दावा करत आहेत.






चीनच्या कम्युनिस्ट सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं पोस्ट केलेला नकाशा, दक्षिण तिबेट म्हणून चीननं दावा केलेल्या अरुणाचल प्रदेश आणि 1962 च्या युद्धात ताब्यात घेतलेला अक्साई चीनचाच भाग असल्याचं दाखवलं आहे. त्याचवेळी भारतानं चीनला वारंवार सांगितलंं आहे की, अरुणाचल प्रदेश हा भारताचाच भाग होता, आहे आणि राहील.


नैसर्गिक संसाधन मंत्रालयाकडून नकाशा जारी 


चायना डेलीच्या वृत्तानुसार, चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयानं सोमवारी झेजियांग प्रांतातील डेकिंग काउंटीमध्ये हा नकाशा जारी केला. या दरम्यान चीन नॅशनल मॅपिंग अवेअरनेस वीक साजरा करतो. दरम्यान, चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाचे मुख्य नियोजक वू वेनझोंग म्हणाले की, सर्वेक्षण, नकाशा आणि भौगोलिक माहिती राष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी, जीवनाच्या सर्व स्तरांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करते. ते पुढे म्हणाले की, नकाशे आपल्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनास समर्थन आणि मदत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे आपलं पर्यावरण आणि सभ्यता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतं.


चीनच्या शेजारील देशांशी प्रादेशिक वाद


चीनचे सीमारेषेपेक्षा जास्त देशांशी प्रादेशिक वाद आहेत. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील चीनी कम्युनिस्ट पक्षानं (सीसीपी) इतर सार्वभौम प्रदेशांवर प्रादेशिक नियंत्रणाचा दावा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी फसवी रणनिती वापरली आहे. अधिक भूभागांवर नियंत्रण ठेवण्याच्या चीनच्या विस्तारवादी प्रयत्नांनी सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे. चीनने आता भारताच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश राज्याच्या काही भागांवर आपला दावा सांगितला आहे आणि ही ठिकाणं तिबेटचा भाग असल्याचा युक्तिवाद केला आहे.


भारतीय ठिकाणांची नावं बदलली


या वर्षी एप्रिलमध्ये चीननं पर्वत शिखरं, नद्या आणि निवासी क्षेत्रांसह 11 भारतीय ठिकाणांची एकतर्फी नाव बदलली होती. यापूर्वीही 2017 आणि 2021 मध्ये, चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयानं इतर भारतीय ठिकाणांची नाव बदलली, ज्यामुळे आणखी एक राजकीय संघर्ष सुरू झाला. मात्र, आतापर्यंत भारत चीनच्या विस्तारवादी योजना फेटाळूनच लावल्या आहेत. 


अक्साई चीनच्या भूभागाचा वाद काय? 


अक्साई चीन हा तिबेटच्या वायव्य भागातील एक वादग्रस्त भूभाग आहे. 1865 मध्ये, विल्यम जॉन्सननं भारत-चीन सीमेचं सर्वेक्षण केलं आणि जॉन्सन लाईननुसार, अक्साई चीन हा जम्मू आणि काश्मीरचा भाग असल्याचं सांगितलं. 1899 मध्ये, एका ब्रिटीश सर्वेक्षणकर्त्यानं मॅकार्न मॅकडोनाल्ड लाईननुसार अक्साई चीनचा चीनचा भाग म्हणून वर्णन केलं. त्यानंतर 50 वर्षांनंतर चीननं अक्साई चीनवर कब्जा करण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आणि 1951 मध्ये याठिकाणी रस्ता बांधण्यास सुरुवात केली. या रस्त्यानं चीनचा शिनजियांग प्रांत तिबेटशी जोडला गेला होता. चीनच्या या कृतीकडे भारतानं फारसं लक्ष दिलं नाही आणि याचाच फायदा चीननं घेतला. कुरापतखोर चीननं 1957 मध्ये 179 किमी लांबीचा रस्ता बांधून आपला धुर्तपणा संपूर्ण जगाला दाखवून दिला. यानंतर 1962 चे युद्ध झालं आणि भारताचा अक्साई चीन चीननं हिसकावून घेतला.