China Birth Rate Declined : जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीन (China) समोर एक नवीन चिंतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. चीनमध्ये प्रजनन दरात (Birth Rate) मोठी घसरण झाली आहे. एकीकडे चीनची लोकसंख्या हळूहळू वृद्ध होत आहे, तर दुसरीकडे चीनचा प्रजनन दर देखील सर्वात खालच्या पातळीवर पोहोचला आहे. घटत्या लोकसंख्येमुळे चीन सरकार चिंतेत आहे. चीनमध्ये 2022 मध्ये जन्म दरात विक्रमी घाट नोंदवण्यात आली आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी जन्मलेल्या बालकांच्या संख्येत 10 टक्क्यांनी घट झाली. चिनी महिला आता मुले जन्माला घालणं टाळत असल्याचं अलीकडच्या ट्रेंडमध्ये दिसून आले आहे. 


शी जिनपिंग यांनीही समस्येकडे लक्ष वेधलं


चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही या समस्येकडे देशाचे लक्ष वेधलं आहे. ऑल चायना वुमेन्स फेडरेशनच्या बैठकीत बोलताना जिनपिंग म्हणाले, "महिलांच्या विकासाचे मोजमाप केवळ त्यांच्या कामाच्या ठिकाणी नाही कौटुंबिक सौहार्द, सामाजिक सौहार्द आणि राष्ट्रीय विकासावर देखील केले पाहिजे." जिनपिंग म्हणाले की, आजच्या तरुणांनी लग्न आणि मुलं जन्माला घालण्यासाठीची आपली विचारसरणी मजबूत करण्याची गरज आहे.


चीनचा प्रजनन दर 10 टक्क्यांनी घटला


चीनमधील नवजात बालकांची संख्या गेल्या वर्षी 10 टक्क्यांनी घसरली असून ही जन्म दराने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. एकीकडे चीन सरकारन नागरिकांना मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहन देत आहे. तसेच, प्रजननाला पाठिंबा देण्यासाठी अनेक सरकारी योजनाही राबवण्यात येत आहे. असं असलं तरी नागरिक प्रयत्नांना जुमानत नसल्याचं दिसत आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, 2022 मध्ये चीनमध्ये फक्त 9.56 दशलक्ष बालकांचा जन्म झाला आहे. 1949 पासूनचा चीनमधील हा सर्वात कमी आकडा आहे.


चीनसमोर अनेक समस्या


सध्या चीन महिलांमध्ये बाळंतपणाची भीती, तरुणांमध्ये विवाहाबाबतचा भ्रम, लिंगभेद, नवजात बालकांच्या संगोपनाचा खर्च अशा अनेक मुद्द्यांवर अंतर्गत संघर्ष सुरु आहे. या विविध समस्यांमुळे चीन सरकार चिंतेत आहे. इतकंच नाही तर, चीनची लोकसंख्या गेल्या वर्षी सहा दशकांत पहिल्यांदाच कमी झाली. ही संख्या वाढवण्यासाठी सरकार सातत्याने अनेक योजनांवर काम करत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी मे महिन्यात या मुद्द्यावर बैठकही घेतली होती. सर्व प्रयत्न करूनही चीनचा प्रजनन दर घसरत आहे. यामध्ये स्थिरता आणण्यासाठी अनेक प्रकारच्या योजनाही आणल्या आहेत.


चीनला भारताला धोका?


चीनमधील सर्वाधित लोकसंख्या वृद्ध आहे आणि त्याच्या शेजारी भारतामध्ये तरुणांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. भविष्यात कामगारांच्या शोधात कंपन्या भारताकडे वळू शकतात, अशी भीती चीन सरकारला वाटत आहे. त्यामुळे चीन भारताला धोका म्हणून पाहत आहे.