तेल अवीव : इस्रायल आणि हमास (Israel Hamas War) यांच्यात सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. इस्रायली सैन्याने जबलिया (Jabalia Gaza refugee Camp) निर्वासित छावणीवर एअरस्ट्राईक केला जात आहे. या युद्धातील हे आतापर्यंतचा सर्वात मोठा संहार मानला जात आहे. या निर्वासित छावणीवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर तेथील ढिगाऱ्यातून किमान 50 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त आहे. गाझाच्या अंतर्गत मंत्रालयाने (Gaza Ministry) सांगितले की, जबलिया निर्वासित शिबिर इस्रायलच्या बॉम्बफेकीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
गाझा पट्टी भागाचे प्रवक्ते काय म्हणाले?
गाझाचे प्रवक्ते इयाद अल-बाझूम यांनी खान युनिस येथील रुग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले की, या इमारतींमध्ये शेकडो नागरिक राहतात. हा भाग इस्रायलच्या हवाई दलाने अमेरिकेत बनवलेल्या सहा अमेरिकन बॉम्बने उद्ध्वस्त केला. गाझा पट्टीवर इस्रायलच्या हल्ल्यामुळे झालेला हा संहार आहे. इस्रायली सैन्याने गाझाच्या उत्तरेकडील भागात केलेल्या जमिनीवरील मोहिमेदरम्यान रात्री 300 ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
व्हिडिओ फुटेज जारी
या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेजही जारी करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी उत्तर गाझा पट्टीतील जबलिया निर्वासित शिबिरातील अनेक घरांवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर ढिगाऱ्यातून किमान 50 मृतदेह बाहेर काढण्यात आले, गाझामधील आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "इस्रायलकडून करण्यात आलेल्या सहांरक हल्ल्यात 50 हून अधिक पॅलेस्टीनी नागरिकांना प्राण गमवावे लागले. त्याशिवाय, 150 हून जण जखमी आहेत.
जबलियाचे रहिवासी राघेब अकाल यांनी बॉम्बस्फोटाबद्दल वृत्तसंस्था 'एएफपी'ला सांगितले की भूकंप झाल्यासारखे वाटले. ज्याने संपूर्ण शिबिर हादरले. हा विनाश मी माझ्या डोळ्यांनी पाहिला होता. बॉम्बस्फोटानंतर पडलेल्या ढिगाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह आणि जखमी लोक दिसत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इस्रायल-हमास युद्धात किती ठार?
'अल जझीरा'च्या वृत्तानुसार, 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या युद्धात इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये किमान 8,525 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक इस्रायलींना आपला जीव गमवावा लागला आहे.
इस्रायली सैनिक गाझामधील आतपर्यंतच्या भागात शिरकाव केला आहे. गाझा शहरातील एका निवासी भागात इस्रायली सैनिक आल्यानंतर चकमक घडली. दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धबंदीचे आवाहन फेटाळून लावले आहे.