चिनी माध्यमं सरकारी इशाऱ्यावर चालतात आणि कम्युनिस्ट पार्टीच्या होकाराशिवाय अशी जाहीर वक्तव्य केली जात नाहीत असा इतिहास आहे. रशिया आणि चीन संबंधही तणावग्रस्त आहेत. चीनच्या गुप्तचर संस्थेनं पाणबुडीशी संबंधित अतिमहत्त्वाच्या फाईल्स चोरल्याचा आरोप रशियानं केला होता. तिकडं जपानच्या ताब्यात असलेल्या काही द्विपसमूहांवरही चिन्यांचा डोळा आहे. अलिकडेच जपान्यांनी चिनी पाणबुडीला त्यांच्या हद्दीतून हाकललं होतं.
तैवानच्या हवाई क्षेत्रात विमानांची घरघर करुन चिनी दहशत पसरवतायत. तिकडं फिलिपिन्स, मलेशिया, हाँगकाँग, इंडोनेशियाशीही तणावग्रस्त संबंध आहेत. आणि व्लादिवोस्तोक शहर प्रशांत महासागरात या सगळ्या देशांच्या साखळीतलं महत्त्वाचं शहर आहे. रशियाच्या उत्तर पूर्व भागातील हे शहर प्रिमोस्की राज्याची राजधानी आहे. उत्तर कोरियाच्या जवळ आहे आणि महत्त्वाचं बंद असल्यानं व्यापाराचं मोठं केंद्रही आहे. हे शहर चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेजवळ आहे. दसऱ्या विश्वयुद्धात जर्मनी आणि रशियातील सैन्यांमध्ये या ठिकाणी भीषण युद्ध झालं होतं.
चीनच्याविस्तारवादी धोरणाचा सर्वाधिक धोका भारताला आहे. याचं उदाहरण नुकतंच लडाखच्या सीमेवर पाहायला मिळालं आहे. भारताने आता सावध भूमिका घेतली असून 1 जुलै रोजी भारतीय लष्कराने सैन्यदलाच्या तीन डिव्हिजन लडाख सेक्टरकडे पाठवल्या आहेत. यामध्ये अनेक स्क्वाड्रन्स आणि रणगाडे असल्याचं सांगितलं जातंय. चीनने एलएसीच्या परिसरात पहिल्यापासून सैन्याची मोठी जमवाजमव केली असल्यामुळे भारतानेही आता त्याला उत्तर म्हणून या परिसरातील सैन्याची हालचाल वाढवली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी चीनने केलेल्या आगळिकीमुळे तब्बल 20 भारतीय जवान शहीद झाले होते. आता चीनने कसलीही कुरापत काढू नये यासाठीच भारताने या परिसरातील सैन्याची उपस्थिती वाढवली आहे.