वॉशिंग्टन, अमेरिका : कामाचा कमी ताण आणि मोठा पगार असे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना 12 तास काम करूनही मनासारखा पगार मिळत नाही. मात्र, जर तुम्हाला दिवसातून फक्त एक तास काम करावे लागले आणि त्या बदल्यात तुम्हाला वर्षाला सव्वा कोटी पगार मिळत असेल तर? ही आश्चर्याची बाब असली तरी गुगलच्या (Jobs In Google) एका कर्मचाऱ्याला एवढा पगार मिळतो. हा कर्मचारी फक्त एक तास काम करतो आणि वर्षाला एक कोटी 20 लाख रुपयांच्या पगाराची कमाईदेखील करतो. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला कंपनीकडून पगारदेखील (Google Employees Salary) मिळतो.
हा कर्मचारी करतो तरी काय?
गुगलचा हा कर्मचारी गुगलमध्ये कोड आणि टूल रायटिंगचे काम करतो. फॉर्च्यूनच्या एका वृ्त्तानुसार, गुगलच्या या कर्मचाऱ्याने आपली ओळख न सांगण्याच्या अटीवर संवाद साधला आहे. त्याने आपले काल्पनिक नाव डेवोन सांगितले आहे. डेवोन हा सकाळी 9 वाजता उठतो आणि नाश्ता तयार करतो. त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत काम करतो. रात्री 9 किंवा 11 वाजत आपल्या स्टार्टअपवर तो काम करतो.
या कर्मचाऱ्याने सांगितले की, जर अधिक तास काम करायचे असते तर मी एखाद्या स्टार्टअपमध्ये इंजिनिअर असतो. कमी तास काम करण्यासाठी अनेकजण गुगलची निवड करतात. तुम्ही अॅपलमध्ये ही काम करू शकता. अॅपलकडून सॉफ्टवेअर इंजिनिअर लोकांवर विशेष प्रेम दाखवतं. या ठिकाणी तुम्हाला अनेक तास काम करावं लागतं असे या कर्मचाऱ्याने म्हटले. डेवोन हा याआधी एका मोठ्या टेक कंपनीमध्ये इंटर्न म्हणून काम करत होता आणि तेव्हाच त्याला माहित होते की जर तो नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला तर तो जास्त काम करणार नाही. त्याने कोड रायटिंग लवकरच आत्मसात केली.
वर्षाला सव्वा कोटींची कमाई आणि बोनस
डेवोन हा अवघ्या 20 वर्षांचा तरुण आहे. त्याला एका लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्स (जवळपास एक कोटी 20 लाख रुपये) पगार मिळतो. तो दररोज एक तास काम करतो आणि केलेल्या कामावर त्याला बोनसही दिला जातो. या वर्षीच्या अखेरीसही त्याला बोनसची अपेक्षा आहे.
सर्वाधिक वेतन देणारी कंपनी
गुगलने जानेवारी महिन्याच्या दरम्यान जवळपास 12 हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले होते. त्याआधीही मागील वर्षी काही प्रमाणात नोकर कपात करण्यात आली होती. त्यानंतरही गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट (Alphabet) ही 2022 मध्ये सर्वाधिक पगार देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत पहिल्या तीन स्थानांमध्ये होती. वॉल स्ट्रीट नुसार, अल्फाबेट कंपनीमध्ये सरासरी दोन लाख 80 हजार डॉलर इतके वार्षिक वेतन दिले जाते.