Corona Vaccine : काही आठवड्यात भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली असतानाच भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी फायझर ही सर्वात पहिली कंपनी ठरली आहे. पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट, भारत बायोटेक आणि अमेरिकेची नोव्हावॅक्स या कंपन्या भारतात कोरोना लसीच्या वितरणाच्या शर्यतीत आहेत.


गेल्याच आठवड्यात फायझरला ब्रिटन आणि बहारीनने लसीकरणाला परवानगी दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये या लसीच्या वापराला सुरुवात होत आहे. आता या कंपनीने भारतात लसीकरणासाठी तात्काळ परवानगी मागितली आहे. याला भारत सरकार कसा प्रतिसाद देतो ते पहावं लागेल.


फायझरने भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे कोरोना लसीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मागितली आहे. सूत्रांच्या मते फायझरने 4 डिसेंबर रोजी DCGI कडे अशा प्रकारचा मागणी अर्ज केला आहे.


साठवणुकीचं आव्हान


फायझरच्या या मागणीला मंजुरी दिल्यानंतर लसीच्या साठवणुकीचं भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. कोरोनावरील या लसीच्या साठवणुकीसाठी -70C तापमानाची आवश्यकता असते. खासकरुन ग्रामीण भागात या लसीचं वितरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बैठका घेत आहेत.


रशियात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात 


जगात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करणारा रशिया हा पहिला देश ठरला आहे. रशियामध्ये 'स्पुटनिक व्ही' या लसीच्या पहिल्या डोसचं वितरण सुरु झालं आहे. त्यानंतर 21 दिवसांनी या लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये शनिवारी 70 लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. भारताप्रमाणे रशियाने सुध्दा लसीच्या वितरणात आरोग्य सेवकांना आणि कोरोना योद्ध्यांना प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे.


पहा व्हिडिओ: COVID-19 Vaccination | रशियामध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात



महत्वाच्या बातम्या: