ब्रिटन : युनायटेड किंगडमच्या ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजने 'जेट सूट' तयार केले होते. रविवारी रॉयल मरिनचा जेट पॅकचा वापरत असतानाचा एक व्हिडीओ समोर आला, यात रॉयल नेव्ही बॅच 2 रिव्हर-क्लास ऑफशोर पेट्रोलिंग म्हणजेच पाण्यावर देखरेख करत होती. एचएमएस तामार या जहाजावरून त्यांनी हे प्रात्यक्षिक केलं.
ही प्रात्यक्षिकं साधारण तीन दिवस सुरू होती. त्यात रॉयल मरिनच्या 42 कमांडोंचा सहभाग होता आणि त्यांनी नेव्हल बोर्डिंग केलं. सुरुवातीला मरिटाईम बोर्डिंग ऑपरेशन्स म्हणजेच व्हिसीट, बोर्ड, सर्च अॅंड सिईजर हे ऑपरेशन अतिशय आव्हानात्मक असतं. समुद्रात वेगात जात असणाऱ्या बोटीवर बाजूनी येऊन चढणं, जहाजाच्या बाहेरील बाजूस असलेल्या शिडीच्या मदतीने बोटीत प्रवेश करणं किंवा हेलिकॉप्टरमधून उडी घेऊन रश्शीच्या मदतीने जहाजावर उतरणं, असे काही या ऑपरेशनचे प्रकार आहेत.
अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसच्या एका माजी अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार सागरी-ऑपरेशन्स मिशनपैकी "व्हीबीएसएस सर्वात जटिल आणि धोकादायक आहे". ते म्हणाले की प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष उपकरण आणि प्रशिक्षण आवश्यक असतं. या त जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो. जेट पॅकच्या सहाय्याने, कमांडो अत्यंत वेगात जाणाऱ्या जहाजापर्यंत पोहोचू शकतो, त्यावर चढू शकतो. त्याचप्रमाणे जहाजावरुन खालीही उतरू शकतो आणि इतरांना जहाजावर चढण्यासाठी शिडी देऊ शकतो. व्हिडिओमध्ये रॉयल मरिन अगदी असेच प्रात्यक्षिक करताना दिसतात.
व्हिडिओमध्ये चित्रित केलेलं दृश्य हा चाचणीचा भाग होता आणि ब्रिटीश सैन्याने हे तंत्रज्ञान विकत घ्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.
जेट पॅकचा वापर सध्यातरी चाचणी म्हणून केला जात आहे. परंतु "लक्ष्यवाहू जहाजांच्या कोणत्याही भागापर्यंत अत्यंत वेगात पोहोचणे, शस्त्रास्त्रे घेण्यासाठी त्वरित हात मुक्त करणे आणि स्वत: चं संरक्षण वाढवण्याची क्षमता राखून ठेवणे, हे यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजने आपल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे.