Amir Khan : ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. मुळ पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश बॉक्सर आमिर खानसोबत (British Boxer Amir Khan ) लुटमारीची घटना घडली. आमिर खान आपल्या पत्नीसह रेस्टॉरंटमधून कारकडे परत येत असताना दरोडेखोरांनी त्याला बंदुकीचा दाख दाखवून 70 लाख रुपये किमतीचे घड्याळ लुटून पळ काढला. या घटनेचे फुटेज समोर आले आहे.  या फुटेजमध्ये बंदुकीच्या जोरावर आमिरवर हा दरोडा टाकण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आमिरच्या पत्नीने हे फुटेज शेअर केले आहे. 


आमिरच्या पत्नीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की,  आमिर आणि त्याची पत्नी रेस्टॉरंटमधून कारजवळ जात असताना दरोडेखोर तेथे पोहोचले. या दरोडेखोरांनी आमिरवर बंदूक रोखून धरली आणि त्याला घड्याळ काढण्यास सांगितले. पूर्व लंडनमधील एका रेस्टॉरंटजवळ ही घटना घडली आहे. आमिरने हातातील घड्याळ काढून दिल्यानंतर लूटारूंनी घटनास्थळावरून पळ काढला. लुटारूंनी अगदी काही सेकंदात हा कारणामा केला आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या चोरीला गेलेल्या घड्याळात 719 हिरे होते. 19 कॅरेट सोन्याचे हे घड्याळ होते   


बॉक्सर आमिर खानने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे. तो सध्या बॉक्सींकपासून दूर आहे. परंतु, अद्याप त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही. या घटनेनंतर त्याने नाराजी व्यक्त केली. 


"मी माझ्या पत्नीसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडून रस्ता ओलांडत होतो. पत्नी माझ्या दोन पावले मागे होती. याचवेळी दोन जण धावत माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्यावर बंदूक रोखली. माझ्याकडून घड्याळ काढून घेऊन दोघेही पळून गेले. माझ्यासोबत घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. परंतु, मी आणि माझी पत्नी पूर्णपणे सुरक्षित आहोत, असे आमिर खानने या घटनेनंतर सांगितले. 


कोण आहे अमिर खान?
 35 वर्षीय आमिर खान हा मुळ पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश बॉक्सर आहे. तो लाइट-वेल्टरवेट वर्ल्ड चॅम्पियन राहिला आहे. बॉक्सिंगचे अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.