Rishi Sunak: ब्रिटनमध्ये नवीन पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन पंतप्रधानांच्या नावाची लवकरच घोषणा केली जाईल. या निवडणुकीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक आणि लिझ ट्रस यांच्यात लढत आहे. 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी येणारा नवा चेहरा कोण असेल हे सोमवारी कळणार आहे.
गेल्या दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या या निवड प्रक्रियेत मतदानाच्या अनेक फेऱ्या झाल्या. यामध्ये सर्वात महत्त्वाचे मतदान कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 1.6 लाखांहून अधिक सदस्यांचे होते. ज्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली. आता सोमवारी पक्ष विजेत्याची घोषणा करेल. हा विजेता केवळ कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता नसेल तर ब्रिटनचा नवा पंतप्रधानही असेल.
निकालानंतर काय होणार?
कंझर्व्हेटिव्ह पक्षात झालेल्या या मतदानानंतर सोमवारी दुपारी लंडनमध्ये म्हणजे भारतात संध्याकाळी पाचच्या सुमारास विजेत्याची घोषणा केली जाईल. या घोषणेनंतर काळजीवाहू पंतप्रधान बोरिस जॉन्सन आपल्या राजीनाम्याची औपचारिक घोषणा करतील आणि ब्रिटनच्या राणीला भेटायला जातील. यानंतर ऋषी सुनक आणि लिझ ट्रसमधील विजयी उमेदवार राणीला भेटतील. या प्रक्रियेनुसार राणीच्या हाताचे चुंबन घेण्यासोबतच नवीन पंतप्रधानांची नियुक्ती केली जाईल. स्कॉटलंडहून परतल्यानंतर नवीन नेता 10 डाउनिंग स्ट्रीटच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचेल. यानंतर ते माध्यमांसमोर आपलं म्हणणं मांडतील. तसेच मंत्रिमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करण्यात येईल. पुढे नवीन पंतप्रधानांना बुधवारी 7 सप्टेंबर रोजी प्रश्नोत्तराच्या तासाला उत्तर देण्यासाठी ब्रिटीश संसदेत उपस्थित राहावे लागेल.
तत्पूर्वी, कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांमधील मतदानाच्या 5 फेऱ्यांमध्ये ऋषी सुनक हे प्रत्येक वेळी सातत्याने पुढे होते. 2015 मध्ये पहिल्यांदा ब्रिटिश संसदेत प्रवेश केलेले ऋषी अवघ्या तीन वर्षांत थेरेसा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. 2019 मध्ये तिसऱ्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्रीपदाची जबाबदारी ऋषी यांच्याकडे सोपवली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतलेले सुनक यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याचं सांगण्यात येतं. अशातच या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरी पुढच्या वेळी त्यांना थेट सार्वत्रिक निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे.
नव्या ब्रिटीश पंतप्रधानांचा मार्ग सोपा नसेल
ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांना दोन वर्षे शिल्लक आहेत. नवीन पंतप्रधानसमोर 9 टक्क्यांहून अधिक चलनवाढ होत असताना अर्थव्यवस्था सांभाळणे हे आव्हान असेल. तसेच हिवाळा सुरू होण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये गॅसचे दर निश्चित करणे कठीण होणार आहे. रशियन-युक्रेन युद्धामुळे संपूर्ण युरोपमध्ये गॅसच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत गॅसचा सर्वाधिक वापर करणाऱ्या हिवाळ्यात किमती कमी ठेवणे ही नव्या ब्रिटीश पंतप्रधानांची कसोटी असेल. अशा स्थितीत ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणुका वेळेपूर्वी जाहीर केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.