लंडन : ब्रिटनमध्ये आता मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगार देश सोडून जात आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर परदेशी कामगार देश सोडून जात असल्याने ब्रिटनची अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर येईल का असा प्रश्न विचारला जातोय. ब्रिटनमध्ये लॉकडाऊनच्या काळात रेस्टॉरन्ट आणि बारमधील अनेक कामगारांनी आपला रोजगार गमावला तसेच ब्रेक्झिट आणि त्यानंतरच्या कोरोना संकटामुळे ब्रिटनमध्ये स्थलांतरीत कामगारांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून त्यांना आता देशात वास्तव्य करणं अवघड होत आहे. 


गेल्या दोन वर्षापासूनची ब्रेक्झिटची प्रक्रिया सुरू आहे. त्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर काही अवघड प्रश्न उभारले होते. त्या प्रश्नांतून वाट काढत असतानाच जगावर कोरोनाचे संकट आले. या कोरानाच्या संकटामुळे ब्रिटनमध्ये सुरुवातीच्या काळातच मोठा लॉकडाऊन लावावा लागला. त्याचा फटका ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. 


केवळ लंडन या एकट्या शहरातून गेल्या वर्षभराच्या काळात सात लाख कामगारांनी बाहेर स्थलांतर केल्याचं अलिकडच्या संशोधनातून समोर आलंय. याचा फटका प्रामुख्याने शहराच्या अर्थव्यवस्थेला आणि शहरातील उद्योगांना बसला आहे. 


 






काम सोडून गेलेले कामगार हे परत कामावर येत नाहीत. त्यामुळे देशातील उद्योगांसमोर आता कौशल्य असलेल्या कामगारांचा तुटवडा आहे. त्यामुळे उद्योगांना फटका बसला असून देशाचा कर-महसूलही कमी झाला असल्याचं किंग्ज कॉलेज लंडन इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक जोनाथन पोर्टेस यांनी सांगितलं. ज्या पद्धतीन देशात, खासकरून लंडनमधून परदेशी कामगार स्थलांतर करत आहेत, ती मोठी चिंतेची गोष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


परदेशी कामगार सोडून जाण्याचा फटका हा हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्राला मोठ्या प्रमाणात बसत आहे. या क्षेत्राला अनुक्रमे 30 टक्के आणि 18 टक्के कामगार सोडून गेल्याचा फटका बसला आहे. कोरोनामुळे सरकारच्या माहिती गोळा करण्यावर काही बंधनं आल्यामुळे नेमके किती कामगार देश सोडून गेले आहेत याचा अंदाज येत नाही. पण लेबर फॉरेन सर्व्हेनुसार, नऊ लाख ते 83 लाख कामगारानी देश सोडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या :