Inflation High: भारताचा (India) शेजारील देश असलेल्या श्रीलंकेत (Sri Lanka) महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Economy) खचली असल्याची स्थिती असून खाद्यपदार्थांच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे देखील परवडत नसल्याचे चित्र आहे. चीनसह अनेक देशांकडून घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला श्रीलंका दिवाळखोरीच्या मार्गावर आहे.


ब्रेड आणि पिठाच्या किमती सर्वोच्च पातळीवर


देशाच्या मध्यवर्ती बँकेने श्रीलंकन ​​रुपयाचे (LKR) अवमूल्यन प्रति अमेरिकी डॉलर 230 रुपयांनी करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी श्रीलंकेतील अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली. शुक्रवारी ऑल सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनने ब्रेड पॅकेटची किंमत एलकेआरने (श्रीलंकन रुपया) वाढवली आहे. आता श्रीलंकेत ब्रेड पॅकेटची नवीन किंमत 110 ते 130 श्रीलंकन ​​रूपयांच्या दरम्यान आहे. तसेच देशात गहूच्या पिठाची किमतीत 35 एलकेआरने वाढ करण्यात आली आहे.


पेट्रोल 254 रुपये प्रतिलिटर


श्रीलंकेतील दुसरी सर्वात मोठी इंधन वितरक कंपनी लंका इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने गुरुवारी मध्यरात्री डिझेल विक्रीच्या किंमतीत प्रति लिटर 75 एलकेआरने आणि पेट्रोलच्या किंमतीत 50 एलकेआर प्रति लिटर वाढ केली आहे. यानंतर तीन चाकी वाहन आणि बस मालकांच्या संघटनेने इंधन दरात सवलत देण्याची मागणी तेथील सरकारकडे केली आहे. असं न केल्यास वाहन भाडे मोठ्या प्रमाणात वाढेल आणि याचा फटका त्यांच्यासह सर्वसामान्यांना पडणार असल्याचे या संघटनांनी सांगितलं आहे.   


विमानांच्या किमती 27 टक्क्यांनी वाढल्या


श्रीलंकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की, विमान तिकिटांच्या किमतीत 27 टक्के वाढ करण्यात आली आहे. अवमूल्यनापूर्वी श्रीलंकन रुपया हा 200 प्रति अमेरिकी डॉलर होता. जो अवमूल्यन झाल्यानंतर 260 प्रति अमेरिकी डॉलर इतका झाला.


दरम्यान, चीनच्या कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेत दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशात महागाई इतकी वाढली आहे की, लोकांना पोट भरणेही कठीण झाले आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा सातत्याने कमी होत आहे. यामुळे श्रीलंकेला परदेशातून जीवनावश्यक वस्तू मागवणे कठीण झाले आहे.